राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:09 AM2021-04-27T04:09:45+5:302021-04-27T04:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्र्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४३.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
कोकण गोव्याच्या बऱ्र्याच भागात तर विदर्भाच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ व २८ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २६ ते २९ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, बीड जिल्ह्यात २७ ते २९ एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २८ व २९ एप्रिल रोजी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.