Rain Alert In Maharashtra: राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 08:53 PM2021-11-21T20:53:06+5:302021-11-21T20:53:19+5:30
पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचवेळी अंदमान समुद्रातही एक सिस्टीम तयार झाली असल्याने संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्रात सध्या पाऊस पडत आहे
पुणे : पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचवेळी अंदमान समुद्रातही एक सिस्टीम तयार झाली असल्याने संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्रात सध्या पाऊस पडत आहे. हा पाऊस आणखी दोन दिवस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, विशेषत: गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
गेल्या २४ तासात मुंबई १.६, नागपूर २.६, पुणे २.३, रत्नागिरी १.६, सातारा ०.४, सांगली ४.१, अकोला १.९, पणजी १२१.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. २२ नोव्हेबर रोजी कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २५ नोव्हेबरला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यात तुरळक पाऊस
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात २२ नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात २३ व २४ नोव्हेंबरला रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात २३ नोव्हेंबरला पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी २२ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात २२ व २३ नोव्हेबरला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.