कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:44+5:302021-05-20T04:11:44+5:30
पुणे : राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला ...
पुणे : राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर अंदमान समुद्र व त्याच्या लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र २२ मेपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागात आणि कोकण, गोवा व विदर्भाच्या तुरळक भागात घट झाली आहे. राज्यात आज सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपूरी येथे ४०.५ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस होते. बुधवारी दिवसभरात पुणे ७.८, लोहगाव ७.४़ कोल्हापूर ०.७, नाशिक १, मुंबई १३, सातांक्रूझ ०.५, अलिबाग २३, रत्नागिरी ०.२, डहाणू ५, अमरावती ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर अंदमान समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राबरोबर २१ मेदरम्यान मॉन्सूनचे वारे दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
पश्चिम बंगाल, ओडिशाला धोका
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळ शमले नसतानाही उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचे बंगालच्या उपसागरात पुढील ७२ तासात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते २६ मेच्या सायंकाळी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह लगतच्या आसाम, मेघालय भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. यावेळी वार्याचा वेग ताशी ४० ते ६० किमी असण्याची शक्यता आहे.