कुकडीच्या डाव्या कालव्याला धोका होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:20 PM2019-01-08T23:20:36+5:302019-01-08T23:21:16+5:30
दुरूस्तीची मागणी : ठिकठिकाणी भगदाडे; २५ वर्षापासून प्रशासनाकडून दुर्लक्ष
राजुरी : येथील कुकडी डावा कालवा ठिकठिकाणी खराब झाला आहे. या कालव्याचे अस्तरीकरण निघाले असल्याने भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांनी दर्शवली आहे. त्यामुळे या कालव्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यात असलेल्या व कुकडी प्रकल्पातील व येडगाव धरणातून सुरू केलेला येडगाव धरण ते कर्जत करमाळा जवळपास अडीचशे किलोमीटर अंतर असून या कालव्याच्या कामाला २५ वर्षांहून अधिक वर्ष झालेली आहेत. या कालव्यातून मोठ्य प्रमाणात तेराशे क्युसेक्स सोडले जात असते. कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी निघालेले असून आतल्या बाजूस मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
साधारण या कालव्याची दुरुस्ती सन २००८ मध्ये करण्यात आली होती. परंतु तेव्हा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे कालव्याला प्लॅस्टर केलेले सिमेंट निघून गेले आहे. तसेच कालव्यामध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली असल्याने कालव्याच्या अस्तरीकरणाला भेगा पडलेल्या आहेत. गेल्याच वर्षी उन्हाळ््यात कालव्याला कर्जत करमाळा या ठिकाणी भगदाड पडून हा कालवा फुटला होता. तेव्हा ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान झाले होते. कालव्याचे प्लॅस्टर निघाल्याने येथील माती पाण्यात वाहून जात आहे. त्यामुळे येथे मोठे खड्डे पडू लागले आहेत. कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण न केल्यास या कालव्याला भविष्यात नक्कीच धोका उद्भवणार आहे. त्यामुळेच खड्डे भरून संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी
केली आहे.
हा कालवा ज्या ठिकाणाहून सुरू झाला आहे त्या ठिकाणापासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. बोरी बुद्रुक या ठिकाणी तर या कालव्याच्या भिंतीमधून गळती होऊन दर सेकंदाला हजारो लिटर पाणी वाया जात आहे.