उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता! उन्हाळ्यात टाळा उष्माघात, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:34 AM2023-04-18T09:34:23+5:302023-04-18T09:34:48+5:30
भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास तर १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यू
पुणे : आपल्या शरीराचे नाॅर्मल तापमान हे ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते; परंतु जर त्यापेक्षा ते वाढले तर घाम येताे आणि थरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते; परंतु शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद हाेऊन ताेंडाला काेरड पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यासाठी उन्हात जाताना काही गाेष्टींची काळजी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.
खारघरमध्ये भरउन्हात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर जवळपास ६०० नागरिकांना उष्माघाताचा त्रास झाला व त्यापैकी १२ हून अधिक नागरिकांचा मृत्यूही झाला. बहुतेकांनी उन्हातून आल्यावर थंड पाणी पिल्यानंतर त्यांना हा त्रास झाला असे बाेलले जात आहे. यावरून उष्माघात किती जीवघेणा ठरू शकताे, ही बाब समाेर आली आहे. म्हणून या उन्हाळ्यात जर स्वत:चा बचाव करायचा असेल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे डाॅक्टर सांगतात.
यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यात उष्णता वाढली आहे. राज्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस व त्यापुढे जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. राज्यात मार्च ते १३ एप्रिलदरम्यान उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संशयित रुग्ण मुंबई उपनगर, नंदुरबार आणि उस्मानाबाद येथील आहेत, तर पुण्यातील दाेन संशयित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसला तरी ही बाब गंभीर आहे. राज्याच्या साथराेग विभागाने ही माहिती दिली आहे.
काय काळजी घ्याल?
- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे.
- उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत.
- सावलीत बसून भरपूर पाणी प्यावे.
जाेखीम काेणाला?
- ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती
- ० ते ५ वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता, मधुमेह, हृदयविकाराचे रुग्ण
- अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती यांना उष्माघाताची जाेखीम आहे.
कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
- कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे
- काच कारखान्यातील कामे
- घट्ट कपड्यांचा वापर
लक्षणे
- पुरळ/घामाेळे
- उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे
- पाय, घोटा आणि हातांना सूज
- थकवा येणे, बेशुद्ध होणे
उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता
शरीराचे तापमान जर ३६.८ अंश सेल्सिअसच्यापुढे गेले तर शरीरातील इतर क्रियांवर परिणाम हाेताे. जर हे तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर मग मेंदूतील तापमान नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेवर परिणाम हाेताे. यावेळी घाम येऊन शरीरातील पाणी संपले, तर मग लघवी बंद हाेते. डाेळ्यापुढे अंधारी येते, मेंदूचा रक्तपुरवठा मंदावताे. अशावेळी उष्माघात हाेऊन वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. - डाॅ. अविनाश भाेंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए