Chandni Chowk Bridge: चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी जय्यत तयारी; ३०० पोलीस, अग्निशमन दल तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 12:50 AM2022-10-02T00:50:32+5:302022-10-02T01:01:23+5:30
Chandni Chowk Bridge Demolished: सुमारे ३० वर्षांपूर्वीचा चांदणी चौकातील पूल इतिहासजमा झाला.
पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला पुण्याच्या चांदणी चौकातील पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला. सुमारे ३० वर्षांपूर्वीचा हा पूल इतिहासजमा झाला. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. या ठिकाणी जमा झालेला मलबा दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. चांदणी पूलातून जाणारी वाहतूक रविवार सकाळी ८ वाजेपर्यंत बंद असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चांदणी पूल पाडण्यासाठी सायंकाळपासून तयारीला सुरुवात करण्यात आली. चांदणी चौकातील पुलाला पांढऱ्या कापडाने झाकण्यात आले होते. धुराळा उडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ज्या कंपनीने नोएडामधील ट्विट टॉवर जमीनदोस्त केले, त्याच इडिफीस कंपनीला हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले. आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनासाठी हा पूल पाडण्याचे काम करण्यात आले. हा पूल पाडण्यासाठी सुमारे ६०० किलोची स्फोटके तसेच १ हजार ३५० डिटोनेटर्सचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
३०० पोलीस, अग्निशमन दल, रुग्णावाहिका तैनात
चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या काही तासांपासून जवळचा परिसर रिकामा करण्यात आला. तसेच हा रस्ता निर्मनुष्य करण्यात आला होता. चांदणी चौकातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तसेच परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पूलाचा पाडकामासाठी ३०० पोलीस, अग्निशमन दलाची २ वाहने, तसेच ३ रुग्णावाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. यानंतर हा मार्ग मोकळा श्वास घेईल. तसेच प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"