चंद्रभागा पंढरपूर पर्यंत पोहचण्याआधीच विषारी; प्लास्टिक, कचऱ्यामुळे पाणी दूषित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 19:29 IST2022-12-19T19:29:36+5:302022-12-19T19:29:48+5:30
जलपर्णीमुळे नदीतील मासे जलचर प्राणी यांचे आरोग्य धोक्यात

चंद्रभागा पंढरपूर पर्यंत पोहचण्याआधीच विषारी; प्लास्टिक, कचऱ्यामुळे पाणी दूषित
रांजणगाव सांडस : 'जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा' असे वर्णन असणाऱ्या पवित्र चंद्रभागा नदी पंढरपूर पर्यंत पोहचण्याआधीच विषारी झाली आहे. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड मधील औद्योगिक क्रांतीमुळे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका झपाट्याने वाढत असून या वाढलेल्या नागरीकरणाच्या समस्या, प्लास्टिक, कचरा, मैला मिश्रित पाणी यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जात आहे.
मुळा मुठा भीमा नद्यांचा संगम असलेले वाळकी रांजणगाव सांडस बेट परिसरात भीमा नदी विषारी होत आहे. नदीकाठावरील गावांचे नागरीकरण झपाटयाने वाढत आहे. गावातली प्लास्टिक कचरा वेस्टेज नदी किनाऱ्यावरील रस्त्यालगत रात्री अपरात्री टाकले जात आहे. त्यामूळे शहराबरोबरच, गावातली कचरा समस्या ने तोंड वर काढले आहे. जलपर्णीमुळे नदीतील मासे जलचर प्राणी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूध देणारी पाळीव जनावरेही हे दूषित पाणी पीत नाही. या केमिकल युक्त पाण्यामुळे जमिनी नापीक क्षारपड झाल्या आहेत. जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असून सकाळ सायंकाळ या भागातील नागरिकांना डासांचा प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे.