कोथरूड मधून इच्छुक असल्याने चंद्रकांतदादा माझ्यावर नाराज; अमोल बालवडकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:03 PM2024-10-03T17:03:33+5:302024-10-03T17:04:11+5:30
मी इच्छुक झाल्याने अनेक कार्यकर्त्यांवर दबाव दिला जातोय कि बालवडकर यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका
पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूडविधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. अशातच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याचे समोर आले आहे. बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला आहे. मी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असल्याने चंद्रकांतदादा माझ्यावर नाराज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. कोथरूड मतदार संघातून इच्छुक असल्याने मला आमच्या पक्षातील काही लोकांनी बहिष्कृत केल्याचा आरोप बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर केला आहे.
बालवडकर म्हणाले, मी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक झालो आहे. एखादा कार्यकर्ता इच्छुक असल्यावर त्याला खिलाडू वृत्तीने त्यांनी घ्यायला पाहिजे होत. माझ्या मतदार संघात कसा इच्छुक होतोय हे त्यांना वाटू लागलंय. गेल्या दोन महिन्यापासून ते माझ्या कार्यक्रमाला येत नाहीत. मी दहीहंडीचे निमंत्रण दिल होतं. त्यांची नाराजी मला समजली आहे. शहराध्यक्षाना निमंत्रण दिल होत कि तुम्ही कार्यक्रमाला या. त्यांची पण इच्छा होती यायची. ते आले नाहीत. त्यांचं आणि माझं वैयक्तिक चांगलं आहे. महाराष्ट्रातील सर्वच नेते कार्यकर्त्यांशी माझा चांगलं आहे. वैयक्तिक माझ कोणाशीही काही वैर नाही. सगळे म्हणतात तू एक नंबर काम करतोय. मी इच्छुक झाल्याने अनेक कार्यकर्त्यांवर दबाव दिला जातोय कि यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. यांनी काही फरक पडणार आहे का? तुम्ही खिलाडू वृत्तीने खेळ ना? मी तुमच्यासाठीही काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
कार्यक्रमाला येणं कधी बंद झालं असं विचारले असता बालवडकर म्हणाले, २२ जुलैला देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त लाडकी बहीण योजनेचा पहिला मेळावा मी घेतला. तेव्हा त्याचा नारळ मी चंद्रकांतदादांच्या हस्ते फोडला. रावसाहेब दानवे उपस्थित होते. कार्यक्रम घेतल्यावर त्यांना काय चुकीचं वाटलं. त्यानंतर ते कार्यक्रमाला परत आले नाहीत. मी मोठे कार्यक्रम घेत असतो. मोठ्या नेत्यांना आमंत्रण देतो. पण कोणी येतच नाही. आपण इच्छुक झालो मग काय गुन्हा झाला का? दुसऱ्या बाजूला २ महिन्यापासून बहिष्कृत केलं जातंय, जनता येतीये पण नेते कार्यक्रमाला येत नाही. म्हणून मी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या नावाखाली काही कार्यक्रम घेतले. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.