Chandrakant Patil : "संभाजीराजेंनी चालढकल केली तर मराठा आरक्षणासाठी जो कोणी पुढे येईल त्याला भाजप पाठिंबा देईल.."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:33 PM2021-06-11T15:33:58+5:302021-06-11T15:35:52+5:30
छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी, तर मिळणार नाही ना, याचा विचार करणे त्यांनी गरजेचे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहे. तसेच त्यांनी राज्यातील विविध वरिष्ठ नेत्यांच्या भेटी गाठी देखील घेतल्या. तसेच शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी रायगडावरून त्यांनी राज्य सरकारला कोल्हापूरात मोर्चा काढण्याचा इशारा देखील दिला आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजेंनी मोर्चाबाबत चालढकल केली तर भाजपा मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जो कोणी पुढाकार घेईल, त्याच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण व संभाजीराजे यांच्या भूमिकेवर भाष्य केले. पाटील म्हणाले, खासदार संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार तर दुसऱ्यावेळी लाँग मार्च काढणार अशी भूमिका घेत आहे. मात्र, या घडीला १६ जूनला कोल्हापुरमध्ये मराठा मोर्चा निघणार का, याची शाश्वती देता येत नाही. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे. संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला या मोर्चाला माझा पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यांनी आपल्या निर्णयावरून माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. दुसऱ्या कुणीही कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला तर त्याला भाजपा पाठिंबा राहील देईल.
पाटील पुढे म्हणाले, आरक्षणाच्या बाबतीत जर वेळ निघून गेली तर मराठा समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी, तर मिळणार नाही ना, याचा विचार करणे त्यांनी गरजेचे आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात चालढकल झाली, तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. असं झालं तर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.