चंद्रकांत पाटील पुण्याचे नवे पालकमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:35 PM2019-06-07T15:35:23+5:302019-06-07T19:40:50+5:30
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून बापट भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्क्याने लोकसभेवर निवडून गेले.
पुणे : पुण्यातून गिरीश बापट लोकसभेत गेल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांचं उत्सुकता होती. त्यात राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत आल्यानंतर उत्कंठा शिगेला पोहचली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.
२०१४ साली राज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पुण्यातून मोठ्या मताधिक्क्याने लोकसभेवर निवडून गेले. तेव्हापासूनच बापट यांच्यानंतर पुण्याचे पालकमंत्री कोण याविषयीच्या राजकीय चर्चांना उधाण आले होते.मात्र भाजपाकडून पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येणार याविषयी कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पद सोपवत भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारीच दिल्याचे दिसत आहे.
खासदार गिरीश बापट यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले पुण्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय घेतला. निवडणुकीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात ते मोर्चेबांधणी करत असल्यामुळे पुण्यातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले
पाटील कोल्हापूरचे असले तरी पुण्याशी त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यापासूनचा संपर्क आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात ते लोकसभा निवडणूक काळात ठाण मांडून बसले होते. पुण्यातील काही निवडक कार्यकर्ते त्यांनी मदतीला घेतले होते. त्यामुळेच त्यांचा त्यांच्याबरोबर चांगला संपर्क आहे. खुद्द बापट यांनीच पाटील यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी असे सांगितले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच त्यांची नियुक्ती झाल्याचे भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी थेट बारामतीच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकून शरद पवारांनाच आव्हान दिले होते.. काही काळ तर वारं बदलणार अशीच चर्चा रंगली होती.. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादीच्या गोट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.चंद्रकांत पाटलांनी लोकसभा निवडणुकीत बारामती मतसंघात कांचन कुल यांच्या प्रचारार्थ कंबर कसली होती...