"जाहीर माफी मागतो, महाराष्ट्र अशांत होऊ नये, आता वाद थांबवावा"; 'त्या' विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांचे सविस्तर पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:43 PM2022-12-12T17:43:43+5:302022-12-12T17:55:39+5:30

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वांची माफी मागितली आहे...

Chandrakant Patil on ink threw in chinchwad Appeal of public apology stop arguing now | "जाहीर माफी मागतो, महाराष्ट्र अशांत होऊ नये, आता वाद थांबवावा"; 'त्या' विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांचे सविस्तर पत्र

"जाहीर माफी मागतो, महाराष्ट्र अशांत होऊ नये, आता वाद थांबवावा"; 'त्या' विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांचे सविस्तर पत्र

googlenewsNext

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर शाई फेकणारे तीन जण आणि एक वृत्तवाहिन्याच्या पत्रकाराला अटक करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि मविआ आक्रमक झाली होती. ठिकठिकाणी पाटील यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. पत्रकार हा शाई फेकणाऱ्यांसोबत मिळून होता, असा आरोपही पाटील यांनी केला होता. त्यानंतर ११ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. आता या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकत हा वाद इथेच मिटवावा अशी मागणी करत प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी या प्रकरणात ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, ती मागे घ्यावी अशी मागणीही केली आहे. 

माफीनाम्यात काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
जय महाराष्ट्र ,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे.या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो.

माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी,अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.

चंद्रकांत पाटलांनी काय वक्तव्य केले होते?

पैठणमध्ये शुक्रवारी कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले. शाळा सुरू करताना तुम्ही सरकारी अनुदानावर अवलंबून का राहता?  डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी  शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे ते म्हणाले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण दिले.

Web Title: Chandrakant Patil on ink threw in chinchwad Appeal of public apology stop arguing now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.