सुप्रिया सुळे यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना 'विशेष' बुके भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 02:09 PM2019-11-04T14:09:02+5:302019-11-04T14:20:47+5:30
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसान झालेल्या पिकांचा आणि फळांचा गुच्छ भेट म्हणून दिला.
पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसान झालेल्या पिकांचा आणि फळांचा गुच्छ भेट म्हणून दिला. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या समजून तत्काळ मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटील यांनी मावळ, दौंड, पुरंदर तालुक्यातील काही भागाची पाहणी केली. त्यावेळी सुळे त्यांच्या समोर आल्या. त्यांनीही काही समस्या पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावेळी त्यांनी अवकाळी पाऊस ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी केली.
यावेळी पाटील म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेव्यतिरिक्त किती नुकसान भरपाई द्यावी लागेल याची चाचपणी सुरु आहे. फळबागांच्या नुकसानाचा पंचनामा प्रशासन करत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.त्यावर पाटील यांनी प्रशासनाला 'माणूस गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नाही. तर आजारी आहे हे महत्वाचे असते त्याचप्रमाणे शेतकरी फळ पिकवतो की भाजीपाला यापेक्षा त्याचे नुकसान झाले आहे हे अधिक महत्वाचे सांगितले, असे सांगून पंचनाम्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांसाठी जमले ते सगळे करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या बैठकीनंतर तीन तालुक्यांची मिळून बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.