"G20 परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 05:19 PM2023-01-09T17:19:37+5:302023-01-09T17:27:43+5:30

देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी...

chandrakant patil said Good opportunity to showcase potential of Pune, Maharashtra and the country on the occasion of G20 conference | "G20 परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी"

"G20 परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी"

Next

पुणे : 'जी-२०' परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत 'जी -२०' परिषदेचे आयोजन यशस्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 'जी -२०' परिषदेच्या तयारीबाबत  पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

'जी -२०' परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधींच्या स्वागतासाठी तसेच शहर सौंदर्यीकरण आणि अनुषंगिक विकासकामांची तयारी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आहे अशा शब्दात प्रारंभी पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, ३७ देशातील १५० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार असल्याने सुरक्षाविषयक तसेच शिष्टाचारासंबंधी सर्व काळजी घ्यावी. पुणे, महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता, गुंतवणूकीची क्षमता संपूर्ण क्षमतेने प्रदर्शित करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त राव यांनी बैठकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीबाबत संगणकीय सादरीकरण केले. या बैठकीसाठी भारत सरकारच्या निर्देशानुसार व समन्वयातून आवश्यक बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने शहर सुशोभिकरणाचे काम कल्पकपणे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था करण्यात येत आहे, अशी  माहिती त्यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठकीनिमित्त देण्यात येणारी प्रतिकात्मक भेटवस्तू, स्मृतीचिन्हे, लावण्यात येणारे प्रदर्शन स्टॉल, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरुपाची भोजनव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने भरडधान्याचे वैशिष्टपूर्ण खाद्यपदार्थ आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

'जी -२०' बैठक स्थळाशेजारी ५ प्रदर्शन दालने लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे महाननगरपालिकेकडून शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात सुरु असलेल्या कामांची माहिती असणारे दालन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराट्र आद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र व पुण्याची औद्योगिक क्षमता प्रदर्शित करणारे दालन, भारतीय जनजातीय सहकारी विपनन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योगची उत्पादनांचा समावेश असलेले दालन तसेच महिला व बचत गटाची उत्पादने आणि सामाजिक वनीकरणांतर्गत बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री दालन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पुणे विद्यापीठात १६ जानेवारी रोजी या पाहुण्यांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुणेरी ढोल पथक, महाराष्ट्राचे मर्दानी खेळ, लावणी जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: chandrakant patil said Good opportunity to showcase potential of Pune, Maharashtra and the country on the occasion of G20 conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.