अधिकाऱ्यांनी रात्रभर नाही पण किमान दिवसभर तरी काम करावे : चंद्रकांत पाटील
By नितीन चौधरी | Published: November 3, 2022 03:29 PM2022-11-03T15:29:37+5:302022-11-03T15:31:23+5:30
विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले...
पुणे : ''महाराष्ट्र लोकसेवा, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर शासकीय विभागात नोकरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला जातो. मात्र, एकदा सरकारी नोकरी मिळाली की, माझं कोण काय करतो, अशी मानसिकता निर्माण होते. ही मानसिकता बदलण्याची गरज असून, रात्रभर नको, किमान दिवसभर तरी काम करा,'' अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कान टोचले. विभागस्तरीय रोजगार मेळाव्याचे पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे विभागात ऊर्जा विभागाअंतर्गत पुणे वीज वितरण कंपनी ६०, कोल्हापूर वीज वितरण कंपनी १०४, बारामती वीज वितरण कंपनी १४३, पुणे वीज पारेषण कंपनी १ असे एकूण ३०८, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे कार्यालयात ३ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद येथे ५ असे एकूण ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
ते म्हणाले, ''राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
राज्यात विविध विभागातील ७५ हजार जागा भरल्या जात आहेत. त्यात पोलीस विभागात सुमारे २० हजार पदे भरली जाणार आहे. तसेच इतर विभागात रिक्त आणि नव्याने निर्माण केली जाणारी पदे भरण्याचा मानस आहे. मात्र, शासकीय नोकऱ्या निर्माण करण्यास मर्यादा आहेत. नोकर भरती केल्यास त्यांच्या वेतनासाठी पैसे नाहीत, हा निधी उभे करायचे असेल तर कर वाढवावा लागेल, परंतु, ते सामन्यांना परवडणे शक्य नाही. त्यामुळे लहानमोठ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, कोल्हापूरचे परेश भागवत आदी उपस्थित होते.