कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील करणार विरोधकांशी चर्चा

By विश्वास मोरे | Published: January 25, 2023 05:19 PM2023-01-25T17:19:22+5:302023-01-25T17:23:25+5:30

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात विरोधक आणि महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाईल...

chandrakant patil said Will hold talks with opponents for Kasba, Chinchwad by-elections | कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील करणार विरोधकांशी चर्चा

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटील करणार विरोधकांशी चर्चा

googlenewsNext

पिंपरी : पोटनिवडणुकीतील उमेदवार जाहीर करण्यासाठी आजची कोअर कमिटीची बैठक होणार नाही. नियोजनाची बैठक झाली. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात विरोधक आणि महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक जाहीर झाली आहे. यासंदर्भात भाजपाची कोअर कमिटीची बैठक नाशिक फाट्याजवळील हॉटेलमध्ये झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेस माजी महापौर आणि प्रभारी मुरलीधर मोहळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, अश्विनी जगताप, राज्य प्रवक्ते एकनाथ पवार, चंद्रकांता सोनकांबळे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘आजची कोअर कमिटीची बैठक ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी नव्हती तर नियोजनासाठी होती. उमेदवारी केंद्रीय कमिटीकडून जाहीर होईल. पूर्वतयारीची बैठक होती. व्यवस्था बूथ आणि शक्ती प्रमुख संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. विविध २० समिती तयार केल्या आहेत. तसेच संघटन सरचिटणीसपदी अमोल थोरात यांची तर इतर नियोजन समिती प्रमुखपदी शत्रुघ्न काटे, माजी पक्षनेते  नामदेव ढाके आणि राजकीय पक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे.’’  

इच्छा असणे गुन्हा नाही
पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढली आहे, या प्रश्नावर पाटील म्हणाले, ‘‘इच्छा असणे गुन्हा नाही. निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्षात इच्छूक असतात. मात्र, भाजपात उमेदवारीचा निर्णय पक्षसंघटना पातळीवरून, श्रेष्ठींकडून घेण्यात येईल. तसेच राजकारण हे मिनिटाला बदलत असते. दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधीपक्षातील सर्वांना पत्रे दिली जातील.’’

उमेदवार जगताप कुटुंबातीलच
कोअर समितीच्या बैठकीनंतर उमेदवार कोण? हे जाहीर होईल, याबाबत उत्सुकता होती. मात्र, नियोजनाची बैठक असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रवक्ते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘चिंचवडचा  उमेदवार हा जगताप कुटुंबातीलच असेल. कोण असेल. हे पक्षश्रेष्ठी ठरवतील.’’

शंकर जगताप म्हणाले, ‘‘निवडणूकीस कसे सामोरे जायचे याबाबत बैठकीत चर्चा झाली. जगताप कुटुंब पक्षनिष्ठ आहे. अजून आम्ही दुखातून सावरलो नाही. उमेदवारीबाबत घरात चर्चा नाही. पक्ष निर्णय घेईल. तो मान्य असेल.’’

Web Title: chandrakant patil said Will hold talks with opponents for Kasba, Chinchwad by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.