हा तर काँग्रेसचा 'मनसे डाव'; चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:39 PM2020-02-05T14:39:13+5:302020-02-05T18:01:14+5:30
हिंदुत्व सोडलेले नाही मग त्यांनी 7 मार्चला अयोध्येला जावे, सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करावी असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला काढला.
पुणे - राज्यातील मुख्यमंत्रिपदावरुन बिनसलेल्या शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षातील तणाव कमी होताना दिसत नाही. यातच भाजपाकडून शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे अशी टीका केली जाते. पुण्यात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा इशारा दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसने शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. ही काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत आहेत. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजप येत आहे याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. हा अतिशय आखलेला डाव आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच काँग्रेसने अतिशय प्लॅनिंगने हिंदुत्वापासून शिवसेनेला दूर नेले. त्यात तयार होणारी पोकळी त्यांना राज ठाकरेंच्या मनसेच्या रूपातून भरून काढली वाजणार जाणार आहे. त्यांचा चाहता म्हणून म्हणेल की, तुम्हाला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे.हळूहळू एक शर्ट काढला, पॅन्ट काढली असा प्रयत्न आहे. त्या जागी मनसेला आणण्याचा डाव आहे. हा डाव उद्धवजींनी समजून घ्यावा. ते वारंवार सांगतात की मी हिंदुत्व सोडलेले नाही मग त्यांनी 7 मार्चला अयोध्येला जावे, सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करावी असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला काढला.
त्याचसोबत उद्धव ठाकरे म्हणाले की नागरीकता संशोधन कायद्यात विरोध म्हणजे ' साप म्हणून भुई बडवण्यासारखे आहे'. उद्धव ठाकरे ते आमच्याशी सहमत झाला असेल तर त्यांनी कायदा राज्यात अस्तित्वात आणावा. आणि त्या विरोधात सुरू असणारी आंदोलने थांबायला हवीत. लहान शाळेतील मुले या कायद्याखाली आझादी म्हणत आहेत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सामना मुलाखतीवरुन लगावला.
तसेच दिल्ली निवडणूक सुरुवातीला एकांगी होती. काँग्रेसने नावाला उमेदवार उभे आहेत. केजरीवाल हे खोटं बोलतात हे पटवून देणे. ही निवडणूक रस्ता आणि गटार प्रश्नांची नाही. जे केजरीवाल शाहीनबागेत जेवण पुरवतात, की काश्मीर भारतात हवा याचा विचार लोकांनी करावा. आमच्या पार्टीत राष्ट्रीय अध्यक्ष भाषणेही करतात आणि घरोघरी जाऊन मतेही मागतात असं सांगत सोशल मीडियावर आलेल्या फोटोचं चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले.