चंद्रकांत पाटील...तुम्हाला पुण्यात बोलावले कोणी होते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:45+5:302020-12-27T04:08:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ‘‘कोल्हापूरला परत जाईन म्हणता पण तुम्हाला इथे बोलावले कोणी होते ते सांगा,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ‘‘कोल्हापूरला परत जाईन म्हणता पण तुम्हाला इथे बोलावले कोणी होते ते सांगा,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार चिमटा काढला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावताना पवार म्हणाले, “पुण्यात येऊन बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करा,” असा सल्ला दिला.
कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर बरेच दिवसांनी पुण्यात आलेल्या अजित पवार यांनी शनिवारी (दि. २६) विधानभवनात प्रशासकीय बैठक घेतली. त्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाटील आणि फडणवीस या दोघांची खिल्ली उडवली.
‘मी कोल्हापूरला परत जाईन,’ असे वक्तव्य पाटील यांनी शुक्रवारी (दि. २५) केले होते. त्यावर पवार म्हणाले, “परत जाईन म्हणता, पण तुम्हाला आधी इथे बोलावले कोणी होते ते सांगा. फडणवीस म्हणत की ‘मी परत येईन, परत येईन,’ तर आता त्यांचे सहकारी ‘मी परत जाईन, परत जाईन’ असे म्हणत आहेत. खरे तर त्यांना कोणीही बोलावले नव्हते, पण तरीही ते आले. त्यांच्या येण्याने कोथरूडमधील आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी व त्यांचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले.”
देवेंद्र फडणवीस यांनीही शुक्रवारी पुण्यात केंद्राच्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात बैलगाडीत बसून फोटो काढले. त्यावरही पवार म्हणाले, की तिथे दिल्लीत शेतकरी राजा रस्त्यावर उतरला आहे. थंडीवाऱ्यात आंदोलन करतो आहे. केंद्र सरकार त्यांच्याबरोबर साधे बोलायलाही तयार नाही आणि येथे बैलगाडीत बसून हे फोटो काढत आहेत. त्याऐवजी त्यांनी दिल्लीत जाऊन त्या आंदोलनकर्त्यांबरोबर बोलायला हवे. त्यांच्या मागण्या समजावून घ्याव्यात.” दिल्लीतील या आंदोलनात महाराष्ट्रातीलही अनेक शेतकरी असल्याचे ते म्हणाले.