चंद्रकांत पाटील यांचे ‘जगन्नाथ जोशी’ होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:27 AM2019-10-02T11:27:57+5:302019-10-02T11:28:41+5:30
पुण्याने नाकारला होता बाहेरचा उमेदवार..
पुणे :शहरात बाहेरचा उमेदवार देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच पहिला व एकमेव राजकीय पक्ष आहे. लोकसभेसाठीही भाजपाने एकदा पुणे लोकसभा मतदारसंघातून याच पद्धतीने पुण्यातील उमेदवारांना डावलून कर्नाटकाचे जगन्नाथ जोशी यांना उमेदवारी बहाल केली होती; मात्र ते पराभूत झाले. अन्य एकाही राजकीय पक्षाने पुण्यात आतापर्यंत लोकसभा किंवा विधानसभेला पुण्याबाहेरचा उमेदवार दिलेला नाही.
भाजपाने कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना डावलून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिथून उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील मूळचे कोल्हापूरचे आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले आहेत. पुण्याशी थेट राजकीय किंवा सामाजिक संबंध नसताना त्यांना विद्यमान आमदाराला डावलून उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सन १९८४मध्येही भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघातून कर्नाटकाचे असलेले जगन्नाथ जोशी यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपाने तोच प्रयोग केला आहे. कोथरूड मतदारसंघ हा युती असताना शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सन २०१४मध्ये युती तुटल्यानंतर तो भाजपाने काबीज केला. प्रा. कुलकर्णी या स्थानिक उमेदवार निवडून आल्या. त्या महापालिकेत नगरसेवक होत्या.
मागील ५ वर्षांत त्यांनी मतदारसंघाची चांगली बांधणी केली. त्यातून हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. तो सुरक्षित वाटल्यामुळेच भाजपाने व खुद्द पाटील यांनीही त्यांच्यासाठी याच मतदारसंघाची निवड केली असल्याचे दिसते आहे.
दरम्यान, पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातून निनावी विरोध होताना दिसतो आहे. अन्य राजकीय पक्षांनाही या संदर्भात भाजपावर टीका केली आहे.
..............
पुण्यातून बाहेर गेलेले उमेदवार
१९७१ - डॉ. बाबा आढाव - खेड लोकसभा (जि. पुणे)
२००९ - शरद पवार - माढा लोकसभा (जि. सोलापूर)
२०१९ - रोहित पवार - कर्जत-जामखेड विधानसभा (जि. नगर)
राज्यातील उमेदवार
१९६३ - यशवंतराव चव्हाण - नाशिक लोकसभा
१९९६ - प्रमोद महाजन - मुंबई ईशान्य लोकसभा
२०१५ - नारायण राणे - वांद्रे पूर्व विधानसभा
राज्याबाहेर निवडणूक लढवणारे उमेदवार
अटलबिहारी वाजपेयी (लखनौ-उत्तर प्रदेश, ग्वाल्हेर-मध्य प्रदेश, लोकसभा), पी. व्ही. नरसिंह राव (रामटेक - लोकसभा),
जॉर्ज फर्नांडिस (मुंबई, मुझफ्फरपूर-बिहार, नालंदा-बिहार लोकसभा), सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज (बेल्लारी लोकसभा,
कर्नाटक) नरेंद्र मोदी (वाराणसी लोकसभा, उत्तर प्रदेश), राहुल गांधी (वायनाड, केरळ)