पुण्याचे कारभारी होण्याचे चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:41 PM2019-11-27T12:41:50+5:302019-11-27T12:42:43+5:30
आशा धुळीस : आता आश्वासनांचे काय होणार ?
पुणे : भाजपचीच पुन्हा सत्ता येणार व राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री आता कोथरूडमधून आमदार झाल्याने कोथरूडकरांसह पुण्याचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असा दावा शहर भाजपने केला़. परंतु कोथरूडमधून विजयी झालेले व पुण्याचे कारभारी होण्याची मनीषा बाळगणारे चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न पूर्णपणे भंगले गेले आहे़.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या महा विकास आघाडीचे सरकार आल्याने, पुण्यातून चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर दोन आमदारांची मंत्रिपदे हुकली गेली़. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच, भाजपने कोथरूडमधून आता चंद्रकांत पाटील आमदार होणार असल्याने शहराचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असाच प्रचार केला़. बाहेरचा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील टीकेचे धनी झाले तरी पाटील हे पुण्याचेच आहेत हा प्रचार भाजपने सुरू ठेवला़. दरम्यानच्या काळात काहींनी तर चंद्रकांत पाटील हेच आता पुण्याचे कारभारी आहेत, असे सांगून पुढील गणिते बांधली़. परंतु, राज्यातील नाट्यमय घडामोडींमुळे पुण्याचा कारभारी होण्याचे स्वप्न कोल्हापूरच्या पाटलांना पूर्ण करता आले नाही व शहर भाजपवर बाहेरून लादलेली पाटीलकी हटली गेली आहे़. भाजपच्या एका खासदारानेच महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान दिल्लीवरून लादलेला उमेदवार असा पाटील यांचा नाव न घेता उल्लेख केला होता़.
केंद्रात सत्ता आहे व राज्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार या आत्मविश्वासात भाजप होती़. यामुळेच का होईना राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री असलेले व तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूड हा सुरक्षित मतदारसंघ निवडून विधानसभेत प्रवेश केला़. या प्रयत्नात त्यांनी कोथरूडकरांना अनेक भरभरून आश्वासने दिली़. विजयी झाल्यावर महिला भगिनींना साड्या वाटल्या़ तर कारभारी म्हणून कोथरूडसह पुण्यातील भाजपचे मताधिक्क्य कमी झाल्याने शहर पदाधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली़. आपण पुण्याचे कारभारी असल्याने भासवून स्वत:कडे सत्ताकेंद्र घेतले, मात्र हे सर्व औटघटकेचेच ठरले़. त्यामुळे आता स्थानिक आमदार म्हणून चंद्रकांत पाटील कोथरूडकरांसह पुण्याला प्राधान्य देणार की प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षकार्याला प्राधान्य देणार हे आता उत्सुकतेचे ठरणार आहे़.
................
माधुरी मिसाळ व लक्ष्मण जगताप यांच्या पदरीही निराशा
पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील यांच्यासह पर्वती मतदारसंघातून हॅट्रिक करणाऱ्या पक्षाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचीही मंत्रिपदाची संधी हुकली गेली़. तर पिंपरी-चिंचवड शहरातून मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या पदरीही निराशा आली आहे़.
......