चंद्रकांतदादा म्हणाले...मी कोल्हापूरला परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:17+5:302020-12-26T04:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते. प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते,” असे भारतीय जनता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेते. प्रत्येकाला इथे सेटल व्हावे असे वाटते,” असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले त्या वेळी पुण्याच्या ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिरात जोरदार हशा पिकला. त्यावर पाटील व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले की,...पण देवेंद्र, मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: आज विरोधकांना सांगून टाकतो. पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर छप्पर खाली येणेच बाकी होते. व्यासपीठावरील आणि प्रेक्षागृहातील प्रत्येकजण या हशात सामील झाला होता.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. २५) चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी हा प्रसंग घडला.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकात पाटील यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून सन २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या वेळी ‘बाहेरचा’ उमेदवार म्हणून विरोधकांनी प्रचार केला. विद्यमान स्थानिक आमदारांचे तिकीट कापून पाटील यांंना पक्षाने संधी दिली. त्यामुळे निवडून आल्यानंतरही ‘बाहेरचे’ ही टीका त्यांना ऐकावी लागली. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी खेळकरपणे केलेल्या वक्तव्यातूनही निरनिराळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.
पाटील यांच्या भाषणापूर्वी गिरीश बापट यांनी नर्मविनोदी टिप्पणी केली. बापट म्हणाले, “मोठा माणूस पुण्यातलाच असतो याचा पुणेकरांना अभिमान आहे. माशेलकर मूळचे गोव्यातील असले तरी आता ते ‘पुणेकर’ आहेत. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या, त्यांनाही आम्ही ‘पुणेकर’ मानतोेेे, कारण त्यांचे शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, कारण त्यांचाही संबंध पुण्याशी आहे. एवढेच काय, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन हेसुद्धा मूळचे ‘भिडे’ असल्याचे पुणेकर सांगतात.” बापट यांच्या या पुणेप्रेमाचा संदर्भ घेत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला परतण्याची भाषा केली.