उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली, आम्ही विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकू- चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 01:01 PM2023-05-18T13:01:01+5:302023-05-18T13:20:39+5:30
२०२४ मध्ये भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढेल....
पुणे : राज्यात येत्या काळात अनेक मोठे नेते भाजपमध्ये येतील. अनेकांना विश्वास बसणार नाही असे विरोधातील नेते पक्षात येतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. २०२४ मध्ये भाजप-सेना एकत्र युतीत निवडणुका लढेल, असंही ते म्हणाले. आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंना त्यांची माणसे संभाळता आली नाहीत. मुख्यमंत्री असताना ते स्वतःच्या पक्षातील अनेक नेत्यांनाही भेटत नव्हते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सरकार आले आहे. जुने सरकार गेल्यानंतर नवीन सरकार येणार. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आलेले सरकार नैसर्गिक आहे. २०१९ मध्ये भाजप सेनेने एकत्र मते मागितली होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं मान्यही केले होते. पण सत्तेच्या लालसेपोटी मविआ सरकार स्थापन झाले होते.
"भाजप-सेना विक्रमी जागा जिंकणार"-
उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली म्हणून सध्याचे सरकार आले आहे. त्यांनी भाजपला दगा देऊन मविआ सरकार स्थापन केले होते. पण हे सरकार टिकू शकले नाही. अखेर हे सरकार पडून फडणवीस-शिंदे सत्तेवर आल्याचे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, पवारांना कुणी राजीनामा मागितला होता हेच कळत नाही. हे एखाद्या वगनाट्यासारखे होते, अशी टिकाही त्यांनी केली. राज्यातील भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहे. भाजप-शिवसेना एकत्र येऊन २०० पेक्षा जास्त जागा जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.