Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:27 IST2024-10-07T12:26:46+5:302024-10-07T12:27:01+5:30
लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते

Sharad Pawar: चंद्रशेखर राव यांचा बीआरएस महाराष्ट्र शरद पवार गटात विलीन
पुणे : भारत राष्ट्र समिती या तेलंगणामधील पक्षाची महाराष्ट्र शाखा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात विलीन करण्यात आली. बीआरएसचे महाराष्ट्र प्रभारी, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तशी घोषणाच रविवारी केली.
मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. शरद पवार, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, हरिभाऊ राठोड व बीआरएस पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांचा सन्मान ठेवला जाईल असे राठोड व सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीआधी चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये त्यांनी ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. मात्र, तेलंगणा विधानसभेतील पराभवाने महाराष्ट्रातही या पक्षाला घरघर लागली आहे.
राज्यात प्रवेश झालेल्या तेलंगणा येथील भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये विलिनीकरण होणार असल्याची चर्चा होती. या पक्षाच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांनी पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. अखेर ६ ऑक्टोबरला पवार यांच्याच उपस्थितीत राज्यातील या पक्षाचे नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाचा काँग्रेसकडून सपशेल पराभव झाला. त्यामुळे त्यांची तेथील हवा गेली. त्यानंतर राज्यातील त्यांच्या पक्षाची चर्चाही बंद झाली. पंढरपूर येथील काही नेते त्यांच्या पक्षात गेले होते. राज्यात पक्षाचे संघटन वाढावे, यासाठी त्यांनी काही पावलेही उचलली होती. सर्व पदाधिकाऱ्यांसह पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे.