Chandrayaan-3: चंद्रयान - ३ चे लँडिंग यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:59 PM2023-08-23T15:59:45+5:302023-08-23T16:00:53+5:30
आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाचा ठरणार
पुणे: आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाचा ठरणार आहे. चंद्रयान ३ आज चंद्राच्या काळोख्या बाजुला उतरणार आहे, ही जागा जगापासून लपून राहिलेली आहे. आजवर भारतासह अन्य देशांनी पृथ्वीकडील प्रकाशमान भागावरच यान उतरविलेली आहेत. अशातच चंद्रयान २ चे अपयश आणि परवाच रशियाच्या लुना २५ चे अपयश यामुळे सर्वांच्या मनात धाकधुक आहे. चंद्रयान -३ आज सायंकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. यशस्वी लँडिंग होण्यासाठी भारतीयांकडून प्रार्थना केली जात आहे. देवासमोर अभिषेक, नारळ चढवून पूजाही केली जात आहे. अशातच चंद्रयान - ३ मोहीम यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे घालण्यात आले आहे
भारताचे चंद्रयान आज सायंकाळी चंद्रावर उतरत आहे. या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. तर संपूर्ण देशभर पूजा अभिषेक, प्रार्थना सुरू आहेत. भारतीय शास्त्रज्ञाना यश मिळावे आणि चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायला साकडे घालण्यात आले आहे. मार्तंड देव संस्थान आणि पुजारी सेवक वर्गाकडून मल्हारी मार्तंडाला देव संस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला. यावेळी देवस्थानचे कर्मचारी भाविक आदी उपस्थित होते