चांडोली नाक्यावर दुचाकीचोर जेरबंद
By admin | Published: October 13, 2016 02:23 AM2016-10-13T02:23:01+5:302016-10-13T02:23:01+5:30
राजगुरुनगरच्या चांडोली टोलनाक्यावर नाकाबंदी करीत असताना खेड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज दोन मोटारसायकलचोरांना पकडण्याची कामगिरी
राजगुरुनगर : राजगुरुनगरच्या चांडोली टोलनाक्यावर नाकाबंदी करीत असताना खेड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आज दोन मोटारसायकलचोरांना पकडण्याची कामगिरी केली. पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोली टोलनाक्यावर आज खेड पोलिसांनी नाकाबंदी लावली होती, त्या वेळी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०च्या दरम्यान काळ्या रंगाच्या बजाज पल्सार (महा- १६ एएक्स २५६३) गाडीवरून दोन तरुण जात असताना पोलिसांनी त्यांना थांबविले. कुंडलिक पाराजी भवारी (वय १९, रा. पिंपळवाडी, घोडेगाव, ता. आंबेगाव) हा गाडी चालवत होता आणि विशाल रावसाहेब गावडे (वय २१, रा. मोरेवस्ती, चिखली, ता. हवेली) हा त्याच्या मागे बसला होता.
संशयावरून त्यांना गाडीसह ताब्यात घेऊन खेड पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही गाडी चोरल्याचे सांगितले. प्रत्यक्षात गाडीचा क्रमांक एमएच १२-जीएम १०६९ असा आहे, तर इंजिन नंबर डीएचजीबीटीएच ६४१६३ असा आहे. गाडीचे मूळ मालक सागर दत्तात्रय कांबळे (रा. बनकर कॉलनी, आकाशवाणीसमोर, हडपसर, ता. हवेली) हे असल्याचे निष्पन्न झाले.
ते घोडेगाव येथे विस्तार अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी आपली मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार २१ सप्टेंबर रोजी आॅनलाईन केली होती. गाडीचोरीची घटना घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने चोरांना घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
खेडचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस वाय. एम. गायकवाड, जी. बी. गवारी, आर. बी. जंगले यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. (वार्ताहर)