परिवर्तन! एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या बारामती तालुक्यातील 'सायंबाच्यावाडी'त चक्क बोटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 06:46 PM2020-12-19T18:46:24+5:302020-12-19T18:49:54+5:30

बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील सायंबाचीवाडी एक दुष्काळी गाव. त्यामुळे पाण्यासाठी वणवण ठरलेलीच..

Change! Boating facility is now available in 'Sayanbachyiwadi' which was once a victim of drought | परिवर्तन! एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या बारामती तालुक्यातील 'सायंबाच्यावाडी'त चक्क बोटींग

परिवर्तन! एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या बारामती तालुक्यातील 'सायंबाच्यावाडी'त चक्क बोटींग

Next

बारामती: बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील सायंबाचीवाडी एक दुष्काळी गाव. कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाण्यासाठी वणवण ठरलेली आहे. त्यामुळे या गावातील पुरूष आणि महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरलाच नव्हता. मात्र २०१८-१९ मध्ये सायंबाचीवाडी एकजुटीने पाणी फाऊंडेशनच्या जल साक्षर चळवळीमध्ये उतरली. बारामती तालुक्यातून सायंबाच्यावाडीने प्रथम क्रमांक पटकावला. फक्त बक्षिसासाठी नाही तर आपली कायम दुष्काळी ही ओळख पुसण्यासाठी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ एकत्र आले. आणि परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. 

‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीचा प्रत्यय सायंबाचीवाडीमध्ये गेल्यावर अनुभवास येतो. कायम दुष्काळाच्या झळा सोसलेल्या सायंबाच्यावाडीमध्ये आता पाझर तलावात बोटींग करता येईल एवढे पाणी भरले आहे. जलसंधारणाची झालेली कामे आणि वरूणराजाने भरभरून दिलेले दान यामुळे सायंबाचीवाडी पाणीदार झाली आहे.

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावाच्या मध्यभागी असणाऱ्या लेंडी पिंपरी या सर्वात मोठ्या तलावातील गाळ उपसला होता. २०२० साली संपूर्ण जिल्ह्यामध्ये अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाला. सायंबाच्यावाडीमध्ये देखील पावसाने सगळे विक्रम मोडले. लेंडी पिंपरी पाझर तलाव व गावाच्या भोवती असणारे ४ ते ५ तलाव भरून वाहू लागले. जलसंधारणाच्या कामामुळे पाझर तलावाच्या भोवतालची शेकडो एकर शेती ओलिताखाली आली.

लेंडी पिंपरी तलाव बनला पर्यटनस्थळ 
सायंबाचीवाडीचे सरपंच प्रमोद जगताप यांनी सांगितले, शहरामध्ये नागरिकांना फिरायला, लहान मुलांना खेळायला बाग, उद्याने असतात. मात्र ग्रामीण भागात विरंगुळ्यासाठी ग्रामस्थांना हक्काचे ठिकाण नसते. त्यामुळे गावच्या मध्यभागी असणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निश्चय केला. ग्रामस्थांनी देखील ही कल्पना उचलून धरली. तलावाच्या भराव्यावर ४०० मिटर लांबीचे दोन ‘मॉर्निंग वॉक ट्रॅक’ तयार केले. ट्रॅकच्या कडेने हिरवेगार लॉन तयार करण्यात आले. जिल्हा परिषदेकडून विशेष निधी अंतर्गत तलावात विहार करण्यासाठी बोट मंजूर केली गेली. तलावाच्या परिसरात पथदिवे, बैठक व्यवस्था आदींची सोय करण्यात आली.आता गावातील अबाल-वृद्ध येथे फिरायला जात आहेत.

मागील आठवर्षांपासून बारामती तालुक्यामध्ये जलसंधारणाची विविध कामे सुरू आहेत. त्यामध्ये ओढा खोलीकरण, नाला खोलीकरण, साठवण बंधारे यांचा समावेश आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती पट्टा पाणीदार होऊ लागला आहे.

- अशोक कोकरे,शाखा अभियंता,लघू पाटबंधारे विभाग. 
 

Web Title: Change! Boating facility is now available in 'Sayanbachyiwadi' which was once a victim of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.