वाहक तारा बदलण्यासाठी वीजपुरवठा होणार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:51 AM2018-09-30T00:51:05+5:302018-09-30T00:51:43+5:30
सहकार्याचे आवाहन : लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
उरुळी कांचन : महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागाच्यावतीने थेऊर उपकेंद्रातून वळती फिडरला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहक तारा बदलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या वीजवाहक तारा बदलकामासाठी २२ केव्ही क्षमतेचा वळती फिडर वापरण्यात येणार आहे. दिवसभरात मर्यादित कालावधीसाठी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याकामी सहकार्य करावे, असे आवाहन उरुळी कांचन महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी केले.
थेऊर उपकेंद्रातून वळती फिडरला वीजपुरवठा करणारी वाहिनी ५० वर्षांपूर्वीची आहे. या वाहिनीवरील २२ केव्ही एसटी विद्युतवाहक तारा जीर्ण अवस्थेत आहेत. या वाहक तारांतून ३५० अँपियरपर्यंत प्रवाह कार्यरत आहेत. उन्हाळी हंगामात अतिदाब व पावसाळी हंगामात या तारांचा वीजजोड तुटून खंडितपणा या समस्या सातत्याने निर्माण होत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून उरुळी कांचन उपविभाग कार्यालयाकडून या संपूर्ण ६० किलोमीटर विस्तारलेल्या वाहिनीवरील तारा बदलण्याची कार्यवाही सुरू केली आहे. २० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कामासाठी वळती फिडर दिवसभर मर्यादित कालावधीसाठी बंद करण्यात येत आहे. महावितरणने आठवड्यातील गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवसांत हे काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दिवसभरासाठी सकाळी १० ते दु. ४ पर्यंत हे काम होणार असल्याने या कालावधीत वळती फिडर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी या फिडरवरील उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, तरडे, शिंदवणे, वळती या गावांत वरील वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
१ किलोमिटर तारा बदलण्याचे काम पूर्ण
उपविभागाने थेऊर उपकेंद्रातून साधारण १ किलोमीटर अंतरावरील तारा बदलण्याचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित कामासाठी होणारा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कार्यवाहीस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे यांनी केले आहे.