जिल्ह्यात सर्व तालुक्यांत आज फेरफार अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:47+5:302021-01-20T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यात महसूल विभागातील वारस नोंदी, फेरफार दुरुस्ती, बोजा आदी २७ हजार नोंदी जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यात महसूल विभागातील वारस नोंदी, फेरफार दुरुस्ती, बोजा आदी २७ हजार नोंदी जिल्ह्यात प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात आता दर महिन्याला फेरफार अदालत घेण्यात येणार आहे. याचा आरंभ बुधवारी (दि. २०) होत असून, एकाच दिवशी सर्व तालुक्यांत ही फेरफार अदालत घेणार असल्याचे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.
लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी नोंदी निर्गत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे या महिन्यातील फेरफार अदालत तिसऱ्या बुधवारी म्हणजेच २० जानेवारीला होणार असल्याचे तेली यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रलंबित नोंदीबाबत विशेष मोहीम घेऊन मागील तीन महिन्यांत ६१ हजार नोंदी निर्गत केल्या. सध्या प्रलंबित असणाऱ्या २७ हजारांपैकी जास्तीत जास्ती नोंदी निर्गत करण्याचा प्रयत्न फेरफार अदालतीमध्ये केला जाणार आहे. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी/तहसीलदार काही फेरफार अदालतीला उपस्थित राहणार आहेत. फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करुन आपल्या नोंदी निर्गत कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.