मनसेत खांदेपालट; पुणे शहराध्यक्षपदाची माळ वसंत मोरे यांच्या गळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 02:18 PM2021-03-03T14:18:37+5:302021-03-03T14:20:14+5:30
तर विद्यमान अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
पुणे : महापालिकेच्या निवडणूकीच्या वर्षभर आधी मनसेच्यापुणे विभागात खांदेपालट झाला आहे. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर बुधवारी (दि. ३) त्यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले होते. मुंबईमध्ये या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली.
वसंत मोरे हे मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडुन आले होते. त्यावेळी गटनेते म्हणुन मोरे यांनी या गटाचे नेतृत्व केले होते. २०१७ च्या निवडणुकीत पालिकेत मनसेचे २ नगरसेवक निवडुन आले होते. त्यातही वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघे नगरसेवक कायम वेगवेगळे आंदोलने करत चर्चेत राहीले. त्यातच आधी शिवसेना आणि त्यानंतर मनसेमध्ये मोरे हे कायम ठाकरेंच्या सोबत राहिले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतही मोरेंना उमेदवारी देण्यात आली होती. आता महापालिका निवडणुकीला वर्ष राहिलेले असतानाच शहराची सूत्रे मोरेंच्या हाती देण्यात आली आहेत.