मराठा आरक्षण मोर्चासाठी पुणे शहरातील वाहतूक मार्गांत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल
By अजित घस्ते | Published: January 22, 2024 07:03 PM2024-01-22T19:03:11+5:302024-01-22T19:04:16+5:30
हे बदल मंगळवारी (दि. २३ ) दुपारी दुपारी तीन वाजल्यापासून करण्यात येतील...
पुणे :मराठा आरक्षण मोर्चासाठी उद्या (दि. २३) मनोज जरांगे हे रांजणगाव येथून कोरेगाव पार्क मार्गे खराडी येथे मुक्कामी येणार आहेत. तसेच बुधवारी (दि. २४) ते पिंपरी-चिंचवड मार्गे लोणावळा येथे जाणार आहेत. मराठा बांधव मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोर्चा मार्गांवर व परिसरात गरजेनुसार वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पुण्याचे वाहतूक पोलिस आयुक्त शशीकांत बोराटे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
हे बदल मंगळवारी (दि. २३ ) दुपारी तीन वाजल्यापासून करण्यात येतील. यात अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात येईल.
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून तसेच कोल्हापूर, सातारा येथून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशीन चौक - मंतरवाडी फाटा-हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला-न्हावरे- शिरूर मार्गे जातील.
- वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून वाहतूक केडगाव-चौफुला नाव्हरा मार्गे शिरूर ते अहमदनगर अशी वळविण्यात येईल.
- पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपासवरून उजवीकडे वळून मगरपट्टा चौक-डावीकडे वळून सोलापूर रोडने यवत-केडगाव-चौफुला-न्हावरे-शिरूर मार्गे जातील.
मराठा मोर्चा बुधवारी (दि. २४) पुणे शहरामधून पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे. यावेळी
- अहमदनगरकडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथून केसनंद-थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळविण्यात येतील.
- वाघोली परिसरातील वाहने वाघोली-आव्हाळवाडी-मांजरी खुर्द-मांजरी बुद्रुक-केशवनगर-मुंढवा चौक अशी वळविण्यात येतील.
- पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहने चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन-विश्रांतवाडी-धानोरी-लोहगाव-वाघोली मार्गे अहमदनगरकडे जातील.
मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल, तसतसा मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येईल. तरी वाहन चालकांनी वरील वाहतूक बदलांचा अवलंब करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.