संगमवाडी येथे बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूकीत बदल
By अजित घस्ते | Published: November 19, 2023 05:11 PM2023-11-19T17:11:05+5:302023-11-19T17:11:15+5:30
अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपी, स्कूल बस यांना हा आदेश लागू नसेल
पुणे:'श्री. हनुमान कथा सत्संग' कार्यक्रमाचे आयोजन ( दि. २० नोव्हेबर ते २२ नोव्हेंबर) या दरम्यान संगमवाडी येथील निकम फार्म, संगमवाडी पुलाजवळ पटांगण येथे बागेश्वर महाराज यांचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमाकरीता नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याअनुसंगाने संगमवाडी रोड व परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी याकरीता या परिसरातील वाहतूकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले असल्याची माहीती पोलिस उप आयुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपी, स्कूल बस यांना हा आदेश लागू नसेल.
असा आहे बदल
- पिंपरी चिंचवड परिसरतून जुना पुणे मुंबई महामार्गावरुन संगमवाडी पार्किंग येथे येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बोपोडी चौक, डावीकडे वळुन खडकी बाजार, होळकर पुल, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, पर्णकुटी चौक मार्गे नगर रोडने खराडी जकातनाका येथे जातील.
- नगर रोडवरुन पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस नगर रोड, शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक, आंबेडकर चौक, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, होळकर पुल. पोल्ट्री फार्म चौकमार्गे जुना पुणे मुंबई महामार्गाकडे जातील.
- पुणे विद्यापीठ चौकातुन संगममवाडी पार्किंगकडे येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, आर.टी.ओ. चौक, जहाँगीर चौक, आंबेडकर सेतुवरुन पुर्णकुटी चौक मार्गे नगर रोडने खराडी जकातनाका येथे जातील.
- नगर रोडवरुन पुणे विद्यापीठ चौकाचे दिशेने जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस नगर रोड पुर्णकुटी चौक, महात्मा गांधी उद्यान, जहाँगीर चौक, आर.टी.ओ. चौक, संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, विद्यापीठ चौकमार्गे जातील.
- नगर रोड वरुन संगमवाडी पार्किंग करीता येणाऱ्या बरोराना संगमवाडी येथे प्रवेश बंद असल्याने या बसेस शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक मार्गे आंबेडकर चौक येथे येवून आंबेडकर चौकाच्या पुढे प्रवाशांना उतरवुन अन्यत्र पार्किंग कराव्यात.
दि. २०नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान संगमवाडी पार्किंग या ठिकाणचा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेसचा (ट्रॅव्हल्स), पिकअप , ड्रॉप पॉईंट थांबा बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी त्यांना तात्पुरत्या स्वरुपात खराडी जकात नाका येथे ट्रॅव्हल्स, पिकअप देण्यात आला आहे.