PMPML च्या अध्यक्षांची अवघ्या ९ महिन्यांत बदली; बकोरियांच्या जागी आता सचिंद्र प्रताप सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:38 PM2023-07-06T20:38:46+5:302023-07-06T20:39:06+5:30
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या आठवड्याला बैठक घेऊन त्यांचे प्रश्न प्रकर्षाने सोडविण्यावर बकाेरिया यांनी भर दिला होता
पुणे : पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची गुरुवारी समाज कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी पशु संवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या नऊ महिन्यांत बकोरियांच्या झालेल्या बदलीमुळे पीएमपीएमएलच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे.
पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच, पीएमपीएमएलचा कारभार बकोरिया यांनी मोठ्या प्रमाणात सुधारण्यास सुरुवात केली हाेती. भाडेतत्त्वावरील बसेसऐवजी स्वत:च्या मालकीच्या बस रस्त्यावर अधिकाधिक प्रमाणावर उतरविण्यावर त्यांनी भर दिला होता. तसेच बस मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, संचलन तूट मिळविणे, ठेकेदारांना शिस्त लावणे व नवीन बस खरेदीचे धोरण त्यांनी प्रकर्षाने राबविले होते. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या आठवड्याला बैठक घेऊन त्यांचे प्रश्न प्रकर्षाने सोडविण्यावर बकाेरिया यांनी भर दिला होता. दरम्यान, बदलीनंतर लागलीच सचिंद्र प्रताप सिंग यांनी पदभार स्वीकारला असून, पीएमपीएमएल कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल)च्या अध्यक्षपदाचा पदभार सचिंद्र प्रताप सिंग यांनी गुरुवारी स्वीकारला. पीएमपी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण खात्यात बदली झाली. त्यांच्या जागी सिंग यांच्या नियुक्तीचा आदेश काढला होता. यानंतर लगेचच सिंग यांनी पीएमपी संचालक व अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह पीएमपीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सिंग यांनी याआधी पशुसंवर्धन खात्यात काम बघितले आहे.