माेदींच्या सभेसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 02:34 PM2019-10-17T14:34:56+5:302019-10-17T14:39:17+5:30
माेदींच्या सभेसाठी शहरातील वाहतुकीत काही बदल करण्यात येणार आहे. तसेच काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुणे : पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र माेदी आज स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा घेत आहेत. संध्याकाळी 4.30 वाजता सभेला सुरुवात हाेणार आहे. माेदींच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सभेच्या आधी शहरातील काही रस्ते बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
असा असेल बदल...
- वाहनचालकांनी डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकातून संभाजी पुलाकडे न जाता उजवीकडे वळून कर्वे रस्त्यावरून पुढे जावे.
- दांडेकर पुलाकडून टिळक चौकाकडे (अलका टॉकीज) जाणारी वाहतूक बंद करणार आहे. वाहनचालकांनी सावरकर चौक, मित्रमंडळ चौकामार्गे जावे.
- स्वारगेट, सारसबागेकडून टिळक रस्त्याकडे जाणारी जाणारी वाहतूक पूरम चौकातून बंद केली आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्त्यावरून पुढे जावे.
- शाहू पूल- दत्तवाडी- जनता वसाहत- पर्वती पायथ्याकडून येणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून नाथ पै चौक, एस. पी. कॉलेजकडे न जाता उजवीकडे वळून कल्पना हॉटेल, सणस पुतळामार्गे पुढे जावे.
- सणस पुतळा, कल्पना हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना ना. सी. फडके चौकातून सरळ नाथ पै चौकाकडे जाता येणार नाही. तसेच त्यांना डावीकडे वळून एस. पी. कॉलेज चौकाकडे जाता येणार नाही. या वाहनांना केवळ शाहू पुलाकडे किंवा सिंहगड रस्त्याने पुढे जाता येईल.
टिळक व शास्त्री रस्ता "नो पार्किंग'
शास्त्री रस्ता, टिळक रस्त्यावरील पार्किंग दुपारी 12 ते रात्री 12 या वेळेसाठी रद्द केली आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरुवारी संबंधित रस्त्यावर वाहने लावू नयेत. दुपारी बारापासून या बदलाची अंमलबजावणी केली जाईल. पोलिसांकडून वेळ व गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल केले जातील.
इथे करा पार्किंग
सभेसाठी येणाऱ्यांसाठी संयोजकांनी दहा ठिकाणी पार्किंग केली आहे. त्यामध्ये गणेश कला क्रीडा, न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, रमणबाग, न. रा. हायस्कूल यासह अन्य ठिकाणी पार्किंग करता येईल. नागरिकांनी सभास्थळी येताना खासगी वाहने टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त गुरुवारी शहरातील वाहतुकीत बदल केला आहे. मात्र बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता हे सर्व रस्ते सुरळीतपणे सुरू राहतील. शास्त्री व टिळक रस्त्यावर गुरुवारी वाहने पार्किंग करता येणार नाहीत.
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा