लोकसहभागातून सहा महिन्यांत गावाचा कायापालट

By admin | Published: January 26, 2016 01:37 AM2016-01-26T01:37:31+5:302016-01-26T01:37:31+5:30

भारताच्या प्रजासत्ताकाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अनेक गावे मूलभूत सेवासुविधांपासून आजही कोसो दूर आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विकासाची फळे आजही

Change of village in six months from public participation | लोकसहभागातून सहा महिन्यांत गावाचा कायापालट

लोकसहभागातून सहा महिन्यांत गावाचा कायापालट

Next

विलास भेगडे,  तळेगाव दाभाडे
भारताच्या प्रजासत्ताकाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अनेक गावे मूलभूत सेवासुविधांपासून आजही कोसो दूर आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विकासाची फळे आजही
चाखता आलेली नाहीत. खासदार आणि आमदारांनी गाव दत्तक घेऊन विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी केले होते. त्यानुसार अनेक खासदार, आमदारांनी आपापल्या सोईची गावेही दत्तक घेतली. परंतु त्यांचा विकास कितपत झाला हे गुलदस्तात आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकासासाठी केलेल्या आवाहनापासून प्रेरणा घेत मावळच्या अत्यंत दुर्गम भागातील डोणे गावाचा कायापालट केला आहे.
‘लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठाना’च्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी लोकश्रमदानातून मावळ तालुक्याच्या डोंगरी भागातील डोणे या गावाचा थक्क करणारा कायापालट केवळ सहा महिन्यांत केला आहे. त्यामुळे बाराशे लोकसंख्येच्या गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकासाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.

शेळके म्हणाले, ‘‘गोपीनाथ मुंडे यांच्या ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रतिष्ठानाने पहिला लक्षवेधी उपक्रम हाती घेतला. त्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. प्रतिष्ठानाने खर्चाची पर्वा न करता या गावांचा विकास करण्याचा निर्धार साकार झाला आहे. त्यासाठी माझे सहकारी आणि गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली. गावविकास करताना गावात चार किमी लांबीचे सिमेंट कॉँक्रीटचे रस्ते, दोन किमीचा पक्का डांबरी रस्ता, १६ शौचालये, मंदिर आणि शाळेच्या इमारतींचे विकासकाम, प्रत्येक घरासमोर पाण्याचा नळ, संगणकयुक्त ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत, स्मशानभूमीचे सुशोभीकरणआणि विकास करता आला आहे.
डोणेगावचे सरपंच संभाजी कोंडे, बाळासाहेब घोटकुले, संजय बाविस्कर, तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घारे, बाबूराव आरोटे, किसन घारे, सोपान कारके, बाबूराव चांदेकर, शिवलिंग कुंभार, नामदेव कोंडे, तुकाराम लांडगे, शेखर काळभोर, राहुल खिलारे, अंकुश
घारे यांच्यासह युवा कार्यकर्ते, ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
गावकरी आणि महिलांनी
श्रमदान केल्याने या विकासाला वेगळेच महत्त्व आहे. आमदार, खासदारांना जमले नाही, ते साध्या कार्यकर्त्याने करून दाखविल्याने सामाजिक कार्य करणाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
सरपंच कोंडे म्हणाले, की प्रतिष्ठानाने हे गाव दत्तक घ्यावे म्हणून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी लेखी मान्यता दिली. तळ्याच्या विकासामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रथमच कायमस्वरूपी मार्गी लागल्याने महिलांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी आता पुढचा संकल्प हाती घेतला आहे. आगामी काळात प्रत्येकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र, जनधन आणि विमा योजनांची खाती
आणि शासकीय योजनांचा लाभ शेतकरी कुटुंबांना घेता यावा म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे गावकऱ्यांना मिळवून देण्याचे कामही सुरू झाले आहे. गावात ग्रंथालय आणि युवकांना करिअरसाठी मार्गदर्शन मिळेल, असे केंद्र उभारण्याचा प्रतिष्ठानाचा मानस आहे. (वार्ताहर)

Web Title: Change of village in six months from public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.