मनसेच्या ‘यू-टर्न’मुळे बदलली समीकरणे
By admin | Published: December 15, 2015 04:09 AM2015-12-15T04:09:53+5:302015-12-15T04:09:53+5:30
स्मार्ट सिटी आराखड्याला ठाम विरोध असल्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाबू वागस्कर मुख्य सभेमध्ये भाषणे सुरू असताना अचानक उभे राहिले
पुणे : स्मार्ट सिटी आराखड्याला ठाम विरोध असल्याची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाबू वागस्कर मुख्य सभेमध्ये भाषणे सुरू असताना अचानक उभे राहिले अन् स्मार्ट सिटी आराखड्याला आमचा आता विरोध राहिला नसून, त्याला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मनसेच्या या घूमजावामुळे स्मार्ट सिटी आराखड्याची सगळी समीकरणेच बदलूून गेली तो मंजूर होण्याचा मार्गातील सर्व अडथळे दूर झाले.
स्मार्ट सिटी आराखडा अंतिम मंजुरीसाठी ९ डिसेंबर रोजी मुख्य सभेमध्ये मांडण्यात आला असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याची टीका करून त्याला तीव्र विरोध करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मुख्य सभेमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी आराखडा मंजूर करण्यास तीव्र विरोध केला होता. त्यानंतर ४ ते ५ दिवस मनसेकडून सातत्याने स्मार्ट सिटी आराखड्याला तीव्र विरोध केला जात होता.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १४ डिसेंबर रोजी स्मार्ट आराखड्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्य सभेचे कामकाज सुरू झाले. राज्य शासनाला अशा पद्धतीने आदेश देण्याचा अधिकारच नसल्याने ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगून मनसेच्या गटनेत्यांसह इतर नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध केला. आयुक्त मुख्य सभेच्या विरोधात राज्य शासनाकडे का गेले, मुख्य सभेने कर्तव्यात काय कसूर केली, याची विचारणा करण्यास सुरुवात केली.
स्मार्ट सिटी आराखड्यावर मते व्यक्त करण्यास सुरुवात झाल्यानंतर मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील यांनी जोरदार भाषण करून स्मार्ट सिटी आराखड्याची चिरफाड केली. त्या म्हणाल्या, ‘‘आयुक्तांना स्मार्ट सिटीमध्ये सहभागी होण्याची एवढी घाई का झाली आहे? काही वृत्तपत्रांना हाताशी धरून आम्हाला व्हिलन ठरविले. आम्ही त्याला घाबरत नसून आमच्या मतावर ठाम आहोत.’’
त्यानंतर अचानक मनसेचे गटनेते बाबू वागस्कर बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सांगितले, ‘‘स्मार्ट सिटीबाबात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. याची मुदत वाढवून घेऊन मुख्यमंत्री स्मार्ट सिटी आराखड्याबाबत स्वयंसेवी संस्था व इतर घटकांशी चर्चा करणार आहेत. यातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीला आमचा विरोध राहणार नाही.’’
बाबू वागस्कर यांच्या या निवेदनानंतर स्मार्ट सिटी आराखडा व आयुक्तांवर जोरदार टीका करणाऱ्या नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना पसरली.
एका फोनने झाला निर्णयामध्ये बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चा झाली असून, त्यांनी आत्ताच फोन करून स्मार्ट आराखड्याला पाठिंबा द्यायला सांगितले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले.