निविदेतील बदल आमच्यामुळेच, समान पाणी योजना, भागीदारी कंपनीही चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:38 AM2017-12-17T05:38:12+5:302017-12-17T05:38:22+5:30
समान पाणी योजनेच्या निविदेत प्रशासनाने केलेला भागीदारी कंपनीलाही निविदा दाखल करता येईल, हा बदल आमच्यामुळेच झाला असल्याचा दावा महापालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला.
पुणे : समान पाणी योजनेच्या निविदेत प्रशासनाने केलेला भागीदारी कंपनीलाही निविदा दाखल करता येईल, हा बदल आमच्यामुळेच झाला असल्याचा दावा महापालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तर महापालिका मुख्यालयात पेढे वाटून व सनई वाजवून याचे स्वागत करण्यात आले.
संपूर्ण शहराला २४ तास पाणी मिळण्याची हमी देणारे ३ हजार १०० कोटी रुपयांचे हे काम निविदास्तरावरच वादग्रस्त झाले आहे. त्याची पहिली निविदा विविध आरोप झाल्यामुळे रद्द करावी लागली. त्यानंतर फेरनिविदा जाहीर करण्यात आली. त्यावरही वाद होत आहेत. त्यात विशिष्ट कंपन्यांना काम मिळावे यासाठी भागीदारी करून कंपन्यांना निविदा दाखल करण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने त्याविरोधात आंदोलन केले. भाजपाचेच सहयोगी खासदार संजय काकडे यांनी तर या निविदेविरोधात आघाडीच उघडली आहे. त्यावरून भाजपात फूट पडू पाहत आहे. त्यात तथ्य आहे, असे दाखवणाºया दोन स्वतंत्र बैठकाही काकडे गटाच्या नगरसेवकांनी घेतल्या आहेत.
विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले, की या एका बदलामुळे महापालिकेचे, पर्यायाने पुणेकरांचे लाखो रुपये वाचणार आहेत. स्थानिक कंपन्याही यात सहभागी होतील. स्पर्धा होईल व त्यामुळे महापालिकेचा फायदा होईल. नगरसेवक सुनील टिंगरे व कार्यकर्ते यात सहभागी होते.
काँग्रेसचा यात सहभाग नव्हता. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी निर्णय घेतला असला तरीही निविदा प्रक्रियेत गडबड होणार नाही, याविषयी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
पेढे वाटून, सनई वाजवून आनंद केला व्यक्त
प्रशासनाने निविदेतील अटींमध्ये बदल करून भागीदारी करून कंपन्यांना निविदा दाखल करण्यात येईल, अशी दुरुस्ती केली. आमच्या आंदोलनामुळेच हे झाले, असा
दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका मुख्यालयात
शनिवारी पेढे वाटले. सनई वाजवून या निर्णयाचा आनंद व्यक्त
करण्यात आला.