अवकाशातील मिलिसेकंद पल्सारमध्ये आढळले बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:19+5:302021-09-08T04:15:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : मिलिसेकंद पल्सारवर आधारित कालमापक यंत्रे आतापर्यंत जगात सर्वांत विश्वसनीय समजली जात होती. मात्र, या ...

Changes found in millisecond pulsars in space | अवकाशातील मिलिसेकंद पल्सारमध्ये आढळले बदल

अवकाशातील मिलिसेकंद पल्सारमध्ये आढळले बदल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

खोडद : मिलिसेकंद पल्सारवर आधारित कालमापक यंत्रे आतापर्यंत जगात सर्वांत विश्वसनीय समजली जात होती. मात्र, या ताऱ्यांच्या वागणुकीत जीएमआरटीच्या शास्त्रज्ञांना बदल आढळले आहेत. यामुळे आता या सिद्धांतावर आधारित कालमापकावर पुढे शंका व्यक्त केली जाणार आहे.

इंडियन पल्सार टायमिंग आरे (आयएनपीटीए) साठी काम करणाऱ्या ४० खगोलशास्त्रज्ञांच्या समूहाला अपग्रेडेड जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचा वापर करून प्रथमच मिलिसेकंद पल्सारमध्ये अनपेक्षित घटनांच्या स्पष्ट नोंदी करण्यात यश मिळाले आहे. ‘मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी लेटर्स’ या जर्नलमध्ये रॅपिड कम्युनिकेशन म्हणून हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाल्याची माहिती एनसीआरएचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी दिली.

मिलिसेकंद पल्सार हे अवकाशातील विलक्षण तारे आहेत. त्यांच्या अत्यंत स्थिर वर्तनामुळे कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्व लहरी शोधण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. या बदलांकडे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले; कारण मिलिसेकंद पल्सारसंदर्भात हे वर्तन शास्त्रज्ञांना अपेक्षित नव्हते. हे तारे कालमापक म्हणून गुरुत्वीय लहरींच्या संशोधनामध्ये पुरेसे ठरतील असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. पल्सार हे प्रचंड घनता असलेले मृत तारे असतात. अवकाशातील दीपगृहांसारखे ते काम करतात. स्वत:भोवतीच्या प्रत्येक प्रदक्षिणेदरम्यान त्यांच्यामधून रेडिओ लहरींचे झोत ते बाहेर फेकतात. या रेडिओ लहरींच्या झोतांचा (पल्सेसचा) कालावधी आणि आकारात अतुलनीय स्थिरता आहे. पल्सेसचा स्थिर आकार ही त्यांची ओळख आहे. घड्याळाप्रमाणे त्यांची ठराविक काळाने होणारी हालचाल तंतोतंत मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पल्सारच्या संकलनासाठी या वेळांची आवर्तने मोजणे हे नजीकच्या भविष्यात नॅनो-हर्ट्झ गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात गरजेचे आहे.

चौकट

यूजीएमआरटीच्या साह्याने नॅनोहर्ट्झ गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी इंडियन पल्सार टायमिंग आरे (आयएनपीटीए) कडून सातत्याने पल्सारच्या एका गटावर लक्ष ठेवले जात आहे. आयएनपीटीए हे भारतीय व जपानी खगोलशास्त्रज्ञांच्या सहकार्याने काम करीत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंडियन पल्सार टायमिंग आरे (आयएनपीटीए) हे आंतरराष्ट्रीय पल्सार टायमिंग आरे (आयपीटीए) या आंतरराष्ट्रीय संघामध्ये समाविष्ट झाले. आयपीटीए ही एक आंतरराष्ट्रीय सहकार्याने नॅनोहर्ट्झ गुरुत्वीय लहरींचे संशोधन करणारी संस्था आहे. पल्सार्सच्या ज्या गटाचा अभ्यास केला जात आहे त्या गटामधील, पीएसआर ‘जे’ पल्सार सर्वांत विश्वसनीय कालमापकांपैकी एक आहे. एप्रिल आणि मे २०२१ दरम्यान आणि त्यानंतर सुरू असलेल्या निरीक्षणांमध्ये या ताऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण लय आणि कालबद्ध वर्तन बदलले असल्याचा सबळ पुरावा मिळाला आहे. या बदलांचा मागोवा घेण्यासाठी आयएनपीटीए गटाने या पल्सारचे सातत्याने निरीक्षण केले. यात अनेक बदल संशोधकांना आढळले. या प्रयोगांसाठी उत्कृष्ट वेळेचे निरीक्षण आवश्यक असल्याने, अशा बदलाची नॅनोहर्ट्झ गुरुत्वाकर्षण लहरींचा विश्वासार्ह शोध घेण्यासाठी नोंद घेणे आवश्यक आहे. यूजीएमआरटीची पुढील निरीक्षणे या अनपेक्षित, पण मनोरंजक घटनेमागील रहस्ये आणि नॅनोहर्ट्झ गुरुत्व लहरींच्या संशोधनात मदत करतील असा विश्वास आहे.

कोट

पल्सार कमी वारंवारितेच्या रेडिओ लहरींमध्ये तेजस्वी दिसतात, म्हणून त्यांचे निरीक्षण कमी वारंवारितेच्या रेडिओ लहरींद्वारे अधिक चांगल्या प्रकारे करता येते. यूजीएमआरटी, ही पुण्यापासून ८० किमीवर असणारी दुर्बीण ही अशा प्रकारच्या रेडिओ लहरी मोजण्यासाठी सक्षम असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या दुर्बिणींपैकी एक आहे. अशाप्रकारे, पल्सारमधील अत्यंत सूक्ष्म बदलही यूजीएमआरटीच्या साह्याने बघू शकतो. - प्रा. भालचंद्र जोशी शास्त्रज्ञ, एनसीआरए, पुणे

Web Title: Changes found in millisecond pulsars in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.