PMC Election | माजी महापौरांसह २३ मान्यवरांच्या प्रभागात बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 01:17 PM2022-05-16T13:17:10+5:302022-05-16T13:20:05+5:30
अंतिम प्रभाग रचना म्हणजे मागच्या प्रभाग रचनेमध्ये राहिलेले फिनिशिंग टच दिल्याचे बोलले जात आहे...
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम रचना शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाली. या अंतिम प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत असून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या प्रमुख नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या प्रारूप आराखड्यानंतर आता अंतिम रचना जाहीर करताना अतिशय किरकोळ, पण संपूर्ण प्रभागाच्या निकालावर परिणाम करू शकतील, असे बदल केले आहेत. त्यामुळे या प्रभाग रचनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांचे प्रभाग अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही प्रभाग सुरक्षित करून दिले आहेत. त्यामुळे अंतिम प्रभाग रचना म्हणजे मागच्या प्रभाग रचनेमध्ये राहिलेले फिनिशिंग टच दिल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या व अंतिम आलेल्या ५८ प्रभागांची रचना सर्वपक्षीय दिग्गजांना सोयीची झाली आहे. माजी सभागृहनेते गणेश बिडकर, माजी महापौर मुरलीधर मोहळ, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. तर माजी महापौरांच्या प्रभागाचा काही भाग शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. बाबुराव चांदेरे यांचा प्रभाग दोनचा झाला असल्याने प्रत्येक पक्षातील नेते मंडळी सुरक्षित प्रभाग झाला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
महापालिका प्रशासनाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर काही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. सुमारे साडेतीन हजार हरकतींवर सुनावणी घेण्यात आली असताना, केवळ ३२ प्रभागात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरकती फेटाळण्यात आल्या असल्याने अनेक कार्यकर्ते व काही नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.
माजी नगरसेवकांमध्ये दत्तात्रय धनकवडे, विशाल तांबे, अरविंद शिंदे, गणेश बिडकर, यांच्या प्रभागात बदल झालेला नाही. माजी महापौर मोहळ, दीपक मानकर, पृथ्वीराज सुतार, आबा बागूल, सुभाष जगताप, आश्विनी कदम, सुशील मेंगडे, शंकर पवार, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, बंडू गायकवाड यांच्या प्रभागात बदल झाले आहेत.