पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळ्यात वाहतुकीत बदल; १०० अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 11:30 AM2024-06-18T11:30:56+5:302024-06-18T11:31:44+5:30
लोणावळ्यातून ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, अशा पोलिस मित्रांचीही एक टीम तयार केली असून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे....
लोणावळा (पुणे) :लोणावळा पोलिसांनी पावसाळी पर्यटनानिमित्त विशेषतः शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवसांतील वाहतुकीत किरकोळ बदल केले आहेत. पुणे मुख्यालयातून याकरिता १०० पोलिस कर्मचारी, अधिकारी, होमगार्डची मागणी केली आहे. पुढील शनिवार, रविवारपासून हा अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लोणावळ्यात दाखल होईल.
लोणावळ्यातून ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, अशा पोलिस मित्रांचीही एक टीम तयार केली असून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
असे असतील वाहतुकीत बदल -
- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंबरवाडी गणपती मंदिर या अंतर्गत रस्त्यावरून सरळ पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने इंदिरानगर, तुंगार्ली येथून नारायण धाम पोलिस चौकीसमोरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहे.
- भुशी धरणाकडून माघारी फिरणारी वाहने ही पुण्याकडे जाण्यासाठी कैलासनगर स्मशानभूमी येथून हनुमान टेकडी, कुसगाव गणपती मंदिरमार्गे सिंहगड कॉलेज येथून मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वे वर सोडण्यात येतील. तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने रायवूड पोलिस चौकी येथून खंडाळा गेट नंबर ३० व अपोलो गॅरेज येथील रेल्वे गेट येथून बाहेर सोडण्यात येतील.
असे असेल नियोजन -
- वाहतुकीच्या नियोजनासाठी कुमार पोलिस चौकी येथे एक कंट्रोल रूम.
- कुमार पोलिस चौकी ए वन चिक्की चौक, मीनू गॅरेज चौक, सहारा पूल येथे भोंग्यांवरून वाहनचालकांना सूचना
- भांगरवाडी इंद्रायणी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकदरम्यान वनवे सुरू.
- लोणावळ्यात येणारी वाहने पुरंदरे शाळेसमोरील रस्त्यावरून व भांगरवाडीच्या दिशेने जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य रस्त्याने जाणार
- मॅकडोनाल्ड समोर रस्त्यावर वाहने उभे करण्यास बंदी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड
वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तसेच टोइंग व्हॅनद्वारे वाहनांवर कारवाई होणार आहे.
भुशी धरण परिसरात वाहने उभी करण्यास मनाई
भुशी धरण परिसरात रस्त्यावर वाहने उभी करता येणार नाहीत. जेथे पार्किंगची व्यवस्था केली आहे, तेथेच पर्यटकांनी आपली वाहने उभी करावीत. खंडाळा राजमाची पॉइंट परिसरातही रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी पर्यटकांनी वाहने उभी करावीत. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.