31st December: नववर्षाचे स्वागत करताना पुण्यातील 'या' रस्त्यांच्या वाहतुकीत बदल
By नितीश गोवंडे | Updated: December 30, 2024 16:56 IST2024-12-30T16:54:49+5:302024-12-30T16:56:16+5:30
मद्यप्राशन करून भरधाव वाहने चालवणारे दुचाकीस्वार, कार चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई होणार

31st December: नववर्षाचे स्वागत करताना पुण्यातील 'या' रस्त्यांच्या वाहतुकीत बदल
पुणे: सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी ५ नंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. लष्कर भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे - वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इस्काॅन मंदिराकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टाॅवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलिस ठाण्याकडे वळवण्यात येणार आहेे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे - कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक येथे बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी रस्तामार्गे वळवण्यात येणार आहे.
महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहनांसाठी बंद...
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मंगळवारी (दि. ३१) सायंकाळी पाच नंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अराेरा टाॅवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.
मद्यपींवर असणार करडी नजर..
मद्यप्राशन करून भरधाव वाहने चालवणारे दुचाकीस्वार, कार चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रीथ ॲनलायजर यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. तपासणीसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिक नळी डिस्पोजेबल असणार आहे, त्याचा पुनर्वापर करण्यात येणार नाही. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.