‘आठ’च्या आत घर गाठण्यासाठी नाटकांच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:39+5:302021-03-31T04:11:39+5:30
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाटकाच्या रात्रीच्या प्रयोगांवर निर्बंध आले. त्यात आता रात्री आठनंतरच्या जमावबंदीच्या आदेशाची भर पडली. नाट्यरसिकांना ...
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाटकाच्या रात्रीच्या प्रयोगांवर निर्बंध आले. त्यात आता रात्री आठनंतरच्या जमावबंदीच्या आदेशाची भर पडली. नाट्यरसिकांना रात्री आठच्या आत घरी परतणे शक्य व्हावे यासाठी नाट्यप्रयोगाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार नाटकाचा प्रयोग सायंकाळी ५ ते सव्वासात या वेळेतच घ्यावा लागणार आहे.
रात्री आठ वाजल्यापासून जमावबंदीच्या आदेशाची रविवार (दि. २८)पासून अंमलबजावणी सुरू झाली. त्याकरिता महापालिकेच्या नाट्यगृहांसह खासगी नाट्यगृहांमध्ये दुपारी १२ ते ३ आणि सायंकाळी ५ ते साडेसात या वेळेत नियोजन करण्यात आले आहे.
नाट्यगृहातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाल्याने पहिल्यांदाच नाट्यगृहात केवळ नाट्यप्रयोग होत आहेत. जमावबंदीमुळे नाटकांचे प्रयोग हे साडेसात वाजेपर्यंत संपविणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाट्यसंस्थांनी ही अट मान्य केली असून, त्यानुसार नाटकाच्या प्रयोगाची वेळ बदलली आहे. आता सायंकाळचा प्रयोग साडेपाचऐवजी पाच वाजता सुरू केला जातो.
बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी (दि. २८) सायंकाळी ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा प्रयोग झाला. पाच वाजता सुरू झालेला प्रयोग मध्यंतर छोट्या कालावधीचा घेतल्यामुळे साडेसात वाजता संपला. त्यामुळे प्रेक्षकांना आठपूर्वी घरी पोहोचणे शक्य झाले, असे महापालिका रंगमंदिर मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनी सांगितले. त्याच धर्तीवर शुक्रवारी (२ एप्रिल) रोजी ‘नाथ हा माझा’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे २ एप्रिल रोजी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ आणि ३ एप्रिल रोजी हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.