‘बकरी ईद’निमित्त वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 07:50 PM2018-08-20T19:50:28+5:302018-08-20T19:51:32+5:30
बकरी ईदनिमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत.
पुणे : बकरी ईदनिमित्त विविध मार्गांवरून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. यादिवशी बुधवारी (दि. २२) मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौकादरम्यानची वाहतूक सकाळी ६.३० पासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
बकरी ईदनिमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्यावेळी बंद राहील. तसेच सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक सकाळी ७ ते १० यावेळीत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदानाकडे तर सोलापुर रस्त्याने मम्मादेवी चौकात येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाणारा मार्ग बंद असेल.
भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येते बंद करून एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात येईल. कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणारी सर्व जड माल वाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी व पीएमपी बसेसला मनाई करण्यात आली आहे. या वाहनांना लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित ठिकाणी जाता येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिले.