चांदणी चौकात प्रवास करताय, जाणून घ्या हा वाहतुकीतील बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:57 PM2021-03-12T17:57:21+5:302021-03-12T18:07:03+5:30
पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचा निर्णय
पुणे: चांदणी चौक पुलावरून कोथरूड व सातारा हायवेच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत कळवण्यात आले आहे.
सर्व्हिस रस्ता बंद केला तरी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. भुगाव, एनडीए आणि कोथरूड रस्त्यावरून येणारी वाहतूक ही चांदणी चौक पुलावरून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्हीबा हॉटेल येथून डाव्या बाजूस वळून हायवेवरून चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील.
तर पाषाण व बावधन कडून येणारी वाहतूक चांदणी चौक पुलावर न जाता ती वाहने व्हीबा हॉटेक येथे उजवीकडे वळून हायवेवरून चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच वरील बदलाबाबत वाहतूक कर्मचारी यांना सहकार्य करावे. असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा यांच्या वतीने करण्यात येत आहे.