मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 06:14 AM2017-07-22T06:14:33+5:302017-07-22T06:14:33+5:30
मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये. यासाठी ‘सीओईपी’च्या मदतीने वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये. यासाठी ‘सीओईपी’च्या मदतीने वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी वाहतुकीत टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येणार असून, येत्या मंगळवारपासून (दि. २५) त्याची अंंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महामेट्रोचे मुख्य प्रकल्प समन्वयक श्रीनिवास कुलकर्णी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (सीओईपी)च्या नगर विकास विभागाचे प्रा. प्रताप रावळ, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस
आयुक्त राजेंद्र भामरे, महामेट्रोचे सल्लागार नीरज जैन यांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत वाहतूक आराखड्याविषयी माहिती दिली.
मेट्रोचा पिंपरी महापालिका ते रेंज हिल दरम्यानचा मार्गाचे काम पूर्ण होण्यास ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शहरात मेट्रोचे काम हे काँक्र ीटच्या मधल्या रस्त्यावर सुरू राहणार आहे. त्यामुळे हॅरीस पुलापासून मेगा मार्ट सिग्नल चौकापर्यंत महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सर्व्हीस रस्त्याने वळविण्यात येणार आहे. हीच वाहतूक नाशिक फाटा चौकातून पुढे खराळवाडी येथील इंडियन आॅईल पेट्रोल पंपापर्यंत पुन्हा सर्व्हीस रस्त्याने वळविण्यात येईल.
खराळवाडी येथून पुण्याकडे येणारी वाहतूक ही केवळ मधल्या
काँक्रीट रस्त्यानेच सुरू राहील. खराळवाडी ते नाशिक फाटा आणि पुढे मेगा मार्ट चौक ते पुढे हॅरीस पुलापर्यंत ही वाहतूक मधल्या एका मार्गामधून सुरू राहील. पूर्ण एक मार्ग केवळ मेट्रोच्या कामासाठी राखीव ठेवण्यात येईल, असे प्रा. प्रताप रावळ यांनी सांगितले.
बीआरटी मार्ग दुचाकीसाठी
मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यावर आवश्यक ते दिशादर्शक, सूचना फलक बसवावे. याबरोबरच रस्त्याला ज्या ठिकाणी वळण दिले असेल त्याअगोदर ५०० मीटर अंतरावर हा सूचना फलक लावावा. रात्री वाहनासाठी रिफ्लेक्टर, ब्लिंकर्स लावावेत. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी दिवसाच्या तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी वाहतूक वॉर्डन तैनात असतील. या काळात बीआरटी लेनमधूनही दुचाकी वाहतूक सुरू करावी, अशा सूचना पालिकेला केल्याचे राजेंद्र भामरे यांनी सांगितले.
नाशिक फाटा उड्डाणपुलाला वळसा
प्रस्तावित मेट्रो मार्गाला नाशिक फाटा उड्डाणपुलाचा अडथळा ठरणार आहे.
त्यामुळे हा उड्डाणपुल पाडण्यात येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्याविषयी मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी
म्हणाले, ‘‘उड्डाणपुलाला मेट्रोचा कोणताही धोका नाही. टाटा उड्डाणपुलाला वळसा घालून मेट्रो जाणार आहे.’’