बारामतीतील मराठा मूक मोर्चासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

By admin | Published: September 28, 2016 04:33 AM2016-09-28T04:33:43+5:302016-09-28T04:33:43+5:30

येथील मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन गुरुवारी (दि. २९) करण्यात आले आहे. मोर्चा सकाळी ११ वाजता कसबा येथील शिवाजी उद्यानामध्ये छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेला

Changes in the traffic system for the Maratha Mumba Morcha of Baramati | बारामतीतील मराठा मूक मोर्चासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

बारामतीतील मराठा मूक मोर्चासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

Next

बारामती : येथील मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन गुरुवारी (दि. २९) करण्यात आले आहे. मोर्चा सकाळी ११ वाजता कसबा येथील शिवाजी उद्यानामध्ये छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. मोर्चानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहनांना व हातगाडी विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.
मोर्चा शिवाजी उद्यान कसबा येथून सुरू झाल्यानंतर कऱ्हा नदी पुलावरून गुणवडी चौक, इंदापूर चौक, सिनेमा रोडमार्गे भिगवण चौक, तीनहत्ती चौक, तीनहत्ती चौकातून गुल पुनावाला उद्यानासमोरून वसंतनगरमार्गे मिशन हायस्कूल ग्राऊंडवर जाईल. या ठिकाणी कोपर्डी घटनेमध्ये झालेल्या अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला, तसेच उरी येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. यानंतर या लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मोर्चाची पाश्वभूमी सांगण्यात येणार आहे.
यानंतर पीडित कुटुंबीयांना मराठा क्रांती मोर्चातर्फे सढळ मदत करण्यात येईल. ती मदत दिल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना मोर्चाचे मुख्य निवेदन देण्यात येईल. यानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात येणार आहे. मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अडीच हजार स्वयंसेवक मोर्चा निघाल्यापासून घटनास्थळापर्यंत, तसेच कार्यक्रम संपून मराठाबांधव ग्राऊंडवरून बाहेर जाईपर्यंत संपूर्ण नियोजन करणार आहेत. मोर्चासाठी येणाऱ्या मराठा बांधवांचा गाड्या लावण्यासाठी बारामतीच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्राऊंड व मोकळ्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळी मोर्चा मार्गावर मोर्चात सहभागी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

मोर्चाच्यानिमित्ताने स्वयंसेवकांचे पथसंचलन
मोर्चा शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत. आज सायंकाळी शारदानगर शैक्षणिक संकुलातील मुलींनी भगवा ध्वज घेऊन पथसंचलन केले. मानवी साखळी करून या मुली पुढे सरकत होत्या. तसेच, स्वयंसेवक मुलांनीदेखील मोर्चाच्या वेळी शिस्त राखण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यापासून शहरात हे पथसंचलन करण्यात आले.

बारामतीत वाहतूक व्यवस्थेत बदल
मराठा समाजाच्या मूक मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. मोर्चा कसबा येथील श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघणार आहे. त्यामुळे बारामती शहरात येणाऱ्या वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २९) सकाळी ७ वाजल्यापासून पाटसमार्गे येणारी वाहने उंडवडी येथून एमआयडीसीमार्गे भिगवण रस्त्याने पुढे जाणार आहेत. भिगवणमार्गे येणारी वाहने रिंगरोडने जळोची, माळावरची देवीमार्गे इंदापूर रस्त्यावर वळविण्यात आली आहेत.

हातगाडी, वाहनांना बंदी
बारामती शहरात मोर्चाच्यानिमित्ताने गर्दी होणार असल्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हातगाडे विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी, चारचाकी गाड्या बाजारपेठेत आणू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोर्चासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ
या मोर्चासाठी दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३ पोलीस निरीक्षक, ४० सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, ६५० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. पोलिसांबरोबरच स्वयंसेवकांमार्फतदेखील मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत होणार आहे.

बारामती ते पाटस मार्गाला जोडणारी वाहतूक विमानतळमार्गे उंडवडीहून पुढे जाणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून शहरामध्ये सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. माळेगावमार्गे येणारी वाहने कऱ्हावागजमार्गे मेडदकडे वळविण्यात आली आहेत. त्याचबरोबर फलटणमार्गे येणारी वाहतूक गवारे फाटा मार्गाने माळेगावकडे वळविण्यात आली आहेत. इंदापूर मार्गावरून येणारी वाहतूक झारगडमार्गे मेखळीकडून पुढे वळविण्यात आली आहे.

दुकाने सुरू ठेवण्याचे संयोजकांचे आवाहन...
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठा मूक मोर्चाच्या आयोजकांनी व्यापारीवर्गाला आवाहन केले आहे, की कोणीही आपले दुकान व व्यवसाय बंद ठेवू नये. हा मूक मोर्चा आहे. त्यामुळे या वेळी ज्या मार्गाने मोर्चा जाणार आहे, त्या मार्गावरील व्यापाऱ्यांनीसुद्धा दुकाने खुली ठेवून मोर्चामध्ये आपल्या सहभाग नोंदवावा. मोर्चासाठी सर्व महिला शिवाजी उद्यान या परिसरात जमा होतील. तसेच मोर्चामध्ये सहभागी होणारे सर्व मराठाबांधवदेखील एकाच ठिकाणी कसबा येथे एकत्रित होतील. वेळ तेथून एकत्रितच मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे. सर्वांनी सकाळी ९ वाजता कसबा येथे जमा व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चात सर्वात पुढे शाळा-कॉलेजच्या मुली, नंतर महिला-भगिनी त्यानंतर वकील, डॉक्टर, ज्येष्ठ व त्यानंतर सर्व जण असे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Changes in the traffic system for the Maratha Mumba Morcha of Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.