खिसमसनिमित्त लष्कर भागातील वाहतूकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:16+5:302020-12-25T04:10:16+5:30
पुणे : ख्रिसमस निमित्ताने कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरिकाची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक ...
पुणे : ख्रिसमस निमित्ताने कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरिकाची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) महात्मा गांधी रोडवरील वाहतूकीत सायंकाळी ७ वाजेपर्यंत बदल करण्यात येत आहे.
वाय जंक्शनवरुन महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ही बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक ताबुत स्ट्रीट रोडमार्गे पुढे सोडण्यात येईल.
वाहनचालकांनी या पर्यायी रस्त्यांचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.