विषाणूतला बदल नवा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:41+5:302020-12-23T04:08:41+5:30
पुणे : कोणताही विषाणु जनुकीय रचनेत नियमित बदल करत असतो. वुहानमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणुमध्येही असे अनेक बदल आढळून आले ...
पुणे : कोणताही विषाणु जनुकीय रचनेत नियमित बदल करत असतो. वुहानमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणुमध्येही असे अनेक बदल आढळून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये आढळून येत असलेला विषाणुही याच प्रक्रियेतील आहे. पण विषाणुच्या प्रसाराचा वेग आणि आजाराचे गांभीर्य यावरून हा विषाणु किती घातक आहे, हे ठरते.
चीनमधील वुहान प्रांतात पहिल्यांदा कोरोना विषाणु आढळून आला. त्यानंतर या विषाणुचा प्रसार जगभरात झाला. पण हा प्रसार होताना त्याच्या जनुकीय रचनेत अनेक बदलही (म्युटेशन) होत गेले. त्यानुसार त्याची नवनवीन लक्षणे समोर येत गेली. पण आतापर्यंत झालेल्या बदलांमुळे विषाणु अधिक घातक झाल्याचे दिसून आले नाही.
सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या विषाणुचा प्रसाराचा वेग अधिक असल्याचा दावा तेथील प्रशासनाने केला आहे. अन्य काही देशांतील या नवीन विषाणुचे रुग्ण आढळून आले आहेत. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नवीन विषाणुच्या प्रसाराचा वेग अधिक असला तरी त्यामुळे मृत्युदर वाढलेला नाही. त्यामुळे हा बदल फारसा घातक नाही. नागरिकांनी मास्कचा वापर, हात धुवणे, फिजिकल डिस्टन्सिंग हे नियम पाळल्यास विषाणुचा प्रसारही रोखता येऊ शकेल. त्यामुळे फारसे घाबरून जाण्याची गरज नाही.
--------------
‘एनआयव्ही’त होते संशोधन
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (‘एनआयव्ही’त) विषाणुच्या जनुकीय रचनेबाबत सातत्याने अभ्यास सुरू आहे. ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार भारतात आतापर्यंत ब्रिटनमधील नवीन विषाणु आढळून आलेला नाही. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.
--------------