बदलत्या हवामानाने संसर्गजन्य आजारांचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:31 AM2018-11-11T02:31:15+5:302018-11-11T02:31:39+5:30
लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी काळजी : हृदयविकारग्रस्तांनी राहावे सावधान !
पुणे : दिवसभरात कधी कडक ऊन, कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा या सगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर येणे, अशा लहरी वातावरणाने लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या मात्र वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंगी आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरून थंड
हवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हातापायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे.
सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतूंचा अनुभव आता एकाच दिवशी मिळत आहे. मात्र, याचा परिणाम ज्येष्ठांसोबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम, याविषयी बालरोग व शिशुतज्ज्ञ डॉ. सचिन आठमुठे यांनी सांगितले, की बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंगीची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर एक ते पाच वर्षांमधील मुलांना ‘हँड, फूट अँड माऊथ डिसीज’ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.
काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे.
रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा; त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हृदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराच्या रुग्णांना याची लागण लगेच होते. वय वर्षे ६०च्या पुढील आणि १५ वर्षांखालील मुलांमध्ये श्वासोच्छ्वासाच्या आणि हृदयविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करून घेणे आणि कुठल्याही प्रकारच्या
सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे, याची काळजी त्यांनी घ्यावी,
असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे सांगतात.
काय करावे ? संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांपासून दूर राहावे
1 अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेऊन स्वच्छतेला महत्त्व द्यावे लागणार आहे.
2दिवाळी म्हटले, की घरोघरी गोडधोड पदार्थांची
रेलचेल असते. काहींना या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो; मात्र त्याकडे
दुर्लक्ष केले जाते. अशा प्रक ारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरू शकते.
वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांना
सायनसने हैराण केले आहे. तर, लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढू लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पू होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारांत वाढ झालेली आहे.
- डॉ. समीर जोशी (कान-नाक-घसा तज्ज्ञ)