सोनसाखळी चोर मोकाटच!
By admin | Published: March 15, 2016 03:57 AM2016-03-15T03:57:31+5:302016-03-15T03:57:31+5:30
चेहरा दिसू नये, कोणाच्या तावडीत सापडू नये, यासाठी चोरट्यांनी आता चोरीचा ट्रेंड बदलला असून, चोरटे वेगवेगळी शक्कल लढवू लागले आहेत. आता दिवसाढवळ्याही सोनसाखळी
- सचिन देव, पिंपरी
चेहरा दिसू नये, कोणाच्या तावडीत सापडू नये, यासाठी चोरट्यांनी आता चोरीचा ट्रेंड बदलला असून, चोरटे वेगवेगळी शक्कल लढवू लागले आहेत. आता दिवसाढवळ्याही सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढले असून, गेल्या आठवडाभरात शहरात विविध ठिकाणी तीन घटना घडल्या. त्यामध्ये एका ठिकाणी चोरट्याने तोंडाला रुमाल बांधला होता, एका चोरट्याने मास्कने संपूर्ण चेहरा झाकला होता. तीन दिवसांपूर्वीच नेहरुनगर येथे सोनसाखळी चोरीच्या घटनेत चोरट्यांनी हेल्मेट घालून एका वृद्ध महिलेची सोनसाखळी लंपास केली. वेगवेगळी शक्कल वापरून सोनसाखळी चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या ६६२ घटना घडल्या असून, त्यांपैकी फक्त ३५० गुन्हे उघडकीस आले आहेत.
मागील आठवड्यात प्राधिकरण, चिखली, पिंपरी आणि तीन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या भोसरीत घरफोडी झाल्याने रहिवाशांना घर बंद करून बाहेरगावी जाण्याची भीती वाटू लागली आहे. प्रत्येक रात्री शहरात घरफोडी, दुकान फोडण्याचे सत्र सुरू आहे. दुचाकी चोरी तर नित्याचीच झाली आहे. आता तर चोरट्यांनी भर चौकात दिवसाढवळ्या महिलांची सोनसाखळी लंपास करण्याचा धडाका सुरू केला आहे. संपूर्ण चेहरा झाकला जाईल, यासाठी हेल्मेटचाही वापर चोरटे करू लागले आहेत. तीन दिवसांपूर्वी नेहरुनगरातील मासूळकर कॉलनीतील रस्त्यावरुन एक ७८ वर्षीय महिला जात होती. त्या वेळी दुचाकीवर डोक्यात हेल्मेट घालून आलेल्या दोन चोरट्यांनी जोरात हिसका देऊन महिलेची सोनसाखळी लंपास केली. हेल्मेट घातल्यामुळे चोरट्यांचा संपूर्ण चेहरा झाकला असल्याचे महिलेने सांगितले. तसेच सांगवीतील रामनगर येथील पादचारी महिलेच्या सोनसाखळी चोरीच्या घटनेत चोरट्यांनी संपूर्ण चेहऱ्यावर मास्क परिधान केला होता, असे त्या महिलेने सांगितले. तसेच गॉगल घातल्यामुळे तर संपूर्ण चेहरा झाकला गेला होता.
पिंपळे सौदागर येथील पीसीएमसी गार्डनशेजारील रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी अशा प्रकारे चोरीला गेल्याची घटना घडली. तोंडाला रुमाल बांधून व गॉगल लावून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी जोरात हिसका देऊन सोनसाखळी लंपास केली असल्याचे त्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात वाकड रस्त्यावर, शिव कॉलनीजवळ सायंकाळच्या वेळी चेहऱ्यावर काळा मास्क परिधान करून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले.
२०१४च्या तुलनेत २०१५ मध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना
कमी घडल्या. गुन्हा उघडकीस
येण्याचे प्रमाणही कमी आहे. तर चोरीच्या घटनांमध्ये पिंपरीत ४४, निगडीत ४६, सांगवीत २७ घटना घडल्या. सर्वांत कमी चतु:शृंगी १७, हिंजवडी २०, चिंचवड २३ या ठिकाणी घटना घडल्या.
लिन्झा मास्कचा वापर
उन्हापासून संरक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी लिन्झा नावाचा हा मास्क बाजारात विक्रीला आला असून, या मास्कचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे. चोरटे आता या मास्कचा उपयोग चोऱ्या, लूटमार करण्यासाठी करीत आहेत. या मास्कमुळे संपूर्ण चेहरा झाकला जात असून, फक्त डोळे उघडे राहतात आणि गॉगल घातल्यावर डोळेही दिसत नाहीत. चोरटे या मास्कचा वापर करून दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेत आहेत, असे पोलीस तपासातून समोर आले आहे.
कवडीमोल दरात विक्री
सोनसाखळी चोरल्यानंतर हे चोरटे अत्यंत कवडीमोल दराने बाहेरच्या जिल्ह्यातील सराफी व्यावसायिकांना विक्री करतात. बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किमतीत हे चोरटे ती सोनसाखळी सराफी व्यावसायिकांना विकतात.
पिंपरीमध्ये घडल्या सर्वाधिक घटना
पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ तीनअंतर्गत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, वाकड या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये २०१४ मध्ये ४०५ घटना घडल्या आहेत. यापैकी १९० घटनांचा छडा लागला. यामध्ये सर्वाधिक सोनसाखळी लंपास करण्याच्या घटनांमध्ये पिंपरीत ८२, निगडी ६१, चिंचवड ५५, एमआयडीसी ५६ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या, तर हिंजवडीत २५ , सांगवीत २६, वाकडमध्ये ८ घटना घडल्या.
सीसीटीव्ही असूनही
चोरटे मोकाट
सोनसाखळी चोरीचे अनेक ठिकाणी घडलेल्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. मात्र, चोरट्यांनी संपूर्ण चेहरा झाकलेला असल्यामुळे चोरट्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज असूनही उपयोग होत नाही.
तपासात अडचणी
चोरी करताना ओळख पटू नये, याकरिता चोरटे तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बांधून चोरी करतात. अलीकडे बाजारात चेहऱ्याच्या संरक्षणासाठी लिन्झा नावाचा मास्क विक्रीला आला असून, या मास्कचा उपयोग आता गैरप्रकारासाठी होत आहे. बहुतांश चोरटे या मास्कचा उपयोग विविध गुन्ह्यांमध्ये करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे चोरट्यांचा शोध घेणे कठीण जाऊ लागले आहे.
- विवेक मुगळीकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी