Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 02:42 PM2023-06-18T14:42:55+5:302023-06-18T14:48:02+5:30
माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप
भरत निगडे
नीरा : नीरा भिवरा पडता दृष्टी !
स्नान करिता शुद्ध सृष्टी!
अंती तो वैकुंठप्राप्ती !
ऐसे परमेष्ठी बोलिला !!
माऊली माऊली' नामाचा जयघोष करीत, टाळ-म्रुदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज रविवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्थानांतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.
पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन - भाकरी, वेगवेगळ्या चटण्या,खरडा, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला.
नीरा नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माऊलींचा पालखी सोहळा साडेदहा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामसेवक मनोज डेरे सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले. अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदिच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगालावुन माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. उन्हाची ताव्रता असल्याने यावर्षी ग्रामपंचायतीने दर्शनरांगेवर मंडप टाकून सावली केली होती. पालखीतळ परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
माऊली माऊलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांना नीरा स्नान #pune#santdnyaneshwar#ashadhiwaripic.twitter.com/ZENtlU0owZ
— Lokmat (@lokmat) June 18, 2023
नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून सर्वात पढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. ब्रिटिशकलीन पुलावरून पालखी सोहळा जाताना मंद वारा सुटला होता. पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळयाचे प्रमुख विश्वस्त अँड.विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुक दत्तघाटावर आणल्या. 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी तिरावर एकच गर्दी केली होती. माऊलिंचा स्नान सोहळा देशभरात पाहता यावा यासाठी टिव्हि चँनल व माध्यम प्रतिनीधींनही मोठ्या संख्येने उपस्थित होते.