भीमाशंकरमध्ये घुमला ‘ओम नमः शिवाय’चा जयघोष; नाताळ सुट्टीनिमित्त २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:35 IST2024-12-26T12:34:32+5:302024-12-26T12:35:00+5:30
भीमाशंकर अभयारण्य परिसरात रस्त्याच्या दुतर्फा दिसणारे घनदाट जंगल असून, त्याठिकाणी असणारे किडे, पक्षी व प्राणी यांचे आवाज हृदयाचे ठोके वाढवल्याशिवाय राहत नाही

भीमाशंकरमध्ये घुमला ‘ओम नमः शिवाय’चा जयघोष; नाताळ सुट्टीनिमित्त २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन
भीमाशंकर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नाताळनिमित्त ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषात दोन लाख भाविकांनी बोचरी थंडी व ढगाळ वातावरणात पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेत पर्यटनाचा आनंद लुटला. परंतु, प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे येणाऱ्या भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
बुधवारी (दि.२५) रात्रीपासूनच श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नाताळनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे दर्शनरांग मुख्य महाद्वारापर्यंत येऊन पोहोचली होती. मंगळवारी सकाळी आठपासूनच गर्दी झाली होती. पुणे, मुंबई, अहिल्यानगर, नाशिकसह परराज्यातील भाविकही मोठ्या संख्येने आले होते. वाहतूक मंचर- भीमाशंकर तसेच मंदोशी मार्गे सुरू आहे. भीमाशंकरकडे येताना पोखरी घाटातून डिंभे धरणाचे मनोहारी दृश्य नजरेस पडत असल्याने येथेही मोठ्या संख्येने पर्यटक थांबत आहेत.
खेड-आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे व पुणे जिल्ह्यातील एकमेव ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकरला १९८५ मध्ये सरकारने १३० चौरस किलोमीटर परिसर अभयारण्य म्हणून जाहीर केला आहे. या परिसराच्या सौंदर्याची ओळख मानवी मनाला भुरळ घालते. अभयारण्य परिसरात प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा दिसणारे घनदाट जंगल असून, या घनदाट जंगलातून येणारे किडे, पक्षी व प्राणी यांचे आवाज हृदयाचे ठोके वाढवल्याशिवाय राहत नाही. भव्यदिव्य हेमाडपंती शिवमंदिर पाहिल्यानंतर भक्त शिवलिंगाच्या दर्शनासाठी अधीर होऊन जातात.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे वाहनतळ नसल्यामुळे तसेच पुढे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या अलीकडेच तीन ते चार किलोमीटरवर पोलिस प्रशासनाकडून वाहने थांबविण्यात येत होती. म्हातारबाचीवाडी येथे वनविभागाच्या चेकपोस्ट येथे कर वसुलीसाठी वाहने थांबत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांची रांग ही एक ते दीड किलोमीटरपर्यंत येऊन पोहोचली होती. गर्दीच्या दिवशी हा नाका बंद करण्यात यावा किंवा कर्मचारी संख्येत वाढ करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांनी केली. भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरामध्ये व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे, विश्वस्त दत्ताभाऊ कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे प्रयत्न करत होते. तर वाहनतळाचे नियोजन तसेच मुख्य रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार शिवाजी केंगले, पोलिस हवालदार तेजस इष्टे, रमेश काठे, गणेश गवारी, पोलिस जवान इंद्रजित वाळुंज, भाऊ कोरके, राठोड हे नियोजन करत होते.